
असं माहेर सुरेख बाई
बदलापूर, ता. ४ (बातमीदार) : सासर कितीही श्रीमंत असले तरीही प्रत्येक लेकीला माहेरची ओढ असतेच. चार दिवस का असेना माहेरी जावे, आई-वडिलांना भेटावे, भावंडांसोबत मस्ती करावी, अगदी सर्व लाड पुरवून घ्यावेत असेच वाटत असते; पण काही कारणांनी अनेक सुनांच्या नशिबी माहेरपण नसते. अशा महिलांचे कौतुक करत त्यांना मायेचा आधार देणारी आणि त्यांचे सर्व लाड पुरवणारे हक्काचे माहेर बदलापुरात आहे. ‘माहेरवाशीण’ उपक्रमांतर्गत प्रभात शिर्के यांनी अशा असंख्य लेकींना हक्काचे माहेर दिले आहे.
बदलापुरात गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळ राहणाऱ्या, कलेची पदवी घेतलेल्या प्रभा शिर्के यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. लग्न झाल्यानंतर सासरी आल्यावर १७ वर्षे नवऱ्याचे आजारपण त्यांनी काढले. या सगळ्या वर्षांत कधी माहेरपण नाही की इतर कोणता विरंगुळा नाही. सतत संघर्ष करत राहणाऱ्या प्रभा शिर्के यांनी महिलांसाठी काहीतरी करण्याचा संकल्प मनाशी बांधला. त्यानंतर त्यांनी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेऊन काही महिलांना त्यात शिक्षण दिले. त्यानंतर महिलांसाठी योगा, जिम यांसारखे व्यवसायाभिमुख शिबिरसुद्धा राबवले. त्यानंतर स्वतःचा संघर्ष डोळ्यांसमोर ठेवून समाजात ज्या महिलांना माहेर नाही किंवा ज्या महिलांना काही कारणास्तव माहेरपणाला जाता येत नाही अशा महिलांना, माहेरपणाची ऊब, जिव्हाळा आणि प्रेम देण्यासाठी ‘माहेरवाशीण’ ही संकल्पना बदलापूर शहरात सुरू केली. या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या राहत्या घरात काही खोल्या बांधून माहेरपणाला येणाऱ्या महिलांना स्वतःच्या घरासारखी सोय करून दिली आहे. कोणत्याही महिलेला या ठिकाणी येऊन स्वतःच्या घरी आल्याची भावना व्हावी यासाठी सगळ्या सोयी-सुविधा पुरवल्या आहेत.
मुख्य म्हणजे या ठिकाणी माहेरपणाला येणाऱ्या महिलांच्या स्वागतासाठी कोमट पाण्याने त्यांचे पाय धुतले जातात. त्यानंतर भाकरीच्या तुकड्याने त्यांची दृष्ट काढली जाते. त्यानंतर या महिलांचे औक्षण करून त्यांना उंबरठ्याच्या आत घेतल्यानंतर, अगदी आपल्या आईच्या घरी माहेरपणाला आल्याची भावना आणि तशी वागणूक प्रभा शिर्के व त्यांच्या इतर सहकारी महिला देत असतात. दिवसभर या ठिकाणी आलेल्या महिलांचे माहेरपण पुरवायला महिला वर्ग राबत असतो. आई जशी मुलीसाठी लगबग करते तशीच लगबग प्रभा शिर्के करत असतात. सकाळी आल्यानंतर पोटभर नाश्ता, त्यानंतर निवांत आराम केल्यावर संगीत खुर्ची, गाण्यांच्या भेंड्या यांसारखे उपक्रम, त्यानंतर दुपारच्या वेळेत अगदी पुरणपोळी, उकडीचे मोदक यांसह महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण त्या स्वतः बनवून या महिलांना खाऊ घालतात. दुपारच्या वेळेत पुन्हा महिलांसाठी वेगवेगळे खेळ, गप्पा-गोष्टी, संध्याकाळच्या वेळी बदलापूर शहरात असणारी उल्हास नदी, बदलापूर जवळीलच मुळगाव येथील खंडोबा देवस्थान, बारवी धरण यांसारखे स्थळ फिरायला नेणे, मुळगावचा प्रसिद्ध असा वडापाव खाऊ घालणे, त्यानंतर पुन्हा घरी आल्यानंतर रात्रीच्या जेवणात महिलांना जे हवे, जो त्यांचा हट्ट असेल जेवणातला तो पुरवला जातो. त्यानंतर पुन्हा एकदा रात्रीच्या गप्पा होतात. माहेरपणाला आलेल्या मुलीचे दुःख, त्याचबरोबर तिच्या मनातल्या इतर गोष्टी प्रभा शिर्के या आईप्रमाणे ऐकून घेतात व तसा सल्लाही या महिलांना देतात. त्यानंतर या महिलांच्या अंगावर पांघरूण घालून डोक्यावरून मायेचा हात फिरवून त्यांना झोपायला सांगतात. सकाळी आरामात उठवणे, या सगळ्या माहेरपणाला हव्या असलेल्या गोष्टी प्रभा शिर्के या महिलांना ‘माहेरवाशीण’ संकल्पनेतून देत असतात.
आईच्या मायेचे माहेरपण
बदलापुरातील साधारण आठ ते दहा महिलांना या संकल्पनेच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. महिलांनी महिलांसाठी महिलांच्या माध्यमातून ही संकल्पना चालवली असून, या संकल्पनेला फक्त बदलापूर किंवा मुंबईचे नव्हे तर राज्यभरातून महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यासाठी अगदी खिशाला परवडतील, असे दर प्रभा शिर्के आकारतात. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांनाही अगदी माफक दरात त्या माहेरपणासाठी बोलावतात. पैसे नाहीत म्हणून कोणतीही महिला माहेरपणापासून वंचित राहू नये, अशी भूमिका प्रभा शिर्के यांनी व्यक्त केली.
हीच माझी पोचपावती : प्रभा शिर्के
आताची पिढी, त्यांचे संस्कार, यात आई-वडिलांपासून वेगळं राहणं किंवा ज्या महिला आधाराशिवाय आपले आयुष्य जगत आहेत अशा महिलांना, या ठिकाणी आल्यावर स्वतःच्या माहेरी आल्याची जाणीव होत असते. त्यामुळे येथून जाताना या माहेरवाशिणींच्या डोळ्यांत माहेरून सासरी जाताना जे अश्रू असतात तेच या महिलादेखील त्यांच्या भावनेतून व्यक्त करतात. त्यांची हीच भावना माझ्या या ‘माहेरवाशीण’ संकल्पनेची पोचपावती असल्याचे प्रभा शिर्के यांनी सांगितले आहे.