
मुलीवर अत्याचार करणारे दोघे सख्खे भाऊ जेरबंद
नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : दिघा परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन गतिमंद मुलीला दोघा सख्ख्या भावांनी तिचे अपहरण करत कारमध्ये अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अखिलेश चनई पासी (वय ४१) व संतोष चनई पासी (वय ४६) यांना रबाळे एमआयडीसी पोलिसांनी सीसी टीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून शोध घेऊन २४ तासांच्या आत अटक केली.
पीडित १७ वर्षीय मुलगी गतिमंद असून ती दिघा परिसरात राहते; तर मुख्य आरोपी अखिलेश पासी हा मुंबईत शिवडी आणि येथे त्याचा मोठा भाऊ संतोष पासी हा दिघा परिसरात राहतो. २५ जानेवारी रोजी अखिलेश हा कार घेऊन दिघा येथे राहणाऱ्या मोठ्या भावाकडे आला होता. रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास दोघे भाऊ कारमधून जात असताना त्यांना ईश्वरनगरमधून पीडित मुलगी जाताना निदर्शनास आली. ती गतिमंद असल्याची माहिती संतोष याला होती. त्याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला कारमध्ये बसवले. त्यानंतर या दोघा भावांनी तिला मुकुंद कंपनीजवळ निर्जन ठिकाणी नेले. त्यानंतर संतोष त्या ठिकाणावरून निघून गेल्यानंतर अखिलेशने मुलीसोबत अश्लील चाळे केले. या वेळी मुलीने विरोध करून आरडाओरड सुरू केल्यानंतर अखिलेशने रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास मुलीला पुन्हा ईश्वरनगर परिसरातील रिक्षामध्ये बसवून पलायन केले होते. मुलीने घरी या प्रकाराबाबत माहिती दिल्याने अत्याचाराची बाब उघड झाली.