
तीन वर्षांत मुंबईचा चेहरा बदलू!
मुंबई, ता. २८ : चाळीस किलोमीटरच्या भूमिगत मेट्रो तीन मार्गांवरून दररोज १७ लाख प्रवासी प्रवास करतील. पाच-सहा वर्षांत सर्व मेट्रो सुरू झाल्यावर मुंबईत कोठूनही कोठेही एक तासात जाता येईल; तर ट्रान्स हार्बर उड्डाण पुलाच्या पलीकडे आकार घेणारी चौथी मुंबई देशाला पुढील १०० वर्षांचा विकास देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सकाळ सन्मान’ कार्यक्रमात व्यक्त केला.
‘सकाळ समूहा’चे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुंबई-गोवा महामार्ग वेळेत पूर्ण करण्याबाबत आम्ही काही बाबतीत अपयशी ठरलो आहोत; पण लवकरच तो महामार्ग पूर्ण होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. एक लाख नागरिकांचे पुनर्वसन करणारा ‘धारावी पुनर्वसन प्रकल्प’ हा जगातील सर्वात मोठा आहे; मात्र तो केवळ पैसे कमावण्याचे साधन नसून एक लाख नागरिकांच्या पुनर्वसनाबरोबरच धारावी हे ‘ग्रोथ इंजिन’ असल्यामुळे तेथील चांगली कारागिरी असलेल्या लघुउद्योगांना विकासासाठी चांगली यंत्रणा देऊ, असेही फडणवीस म्हणाले. जेएनपीटी बंदराची टर्मिनल आता कमी पडत आहेत; मात्र वाढवण बंदरामुळे आपण ‘ग्लोबल सप्लाय चेन’चा एक भाग बनू, अशी खात्रीही त्यांनी वर्तवली.
आर्थिक गुन्ह्यांवर वेगळी यंत्रणा
सध्या वाढणाऱ्या सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांबाबत एक वेगळी यंत्रणा आम्ही तयार करत आहोत. त्यात सर्व बँका, वित्तसंस्था आणि संबंधित यंत्रणा असतील. त्याने अशा गुन्ह्यांप्रकरणी त्वरेने कारवाई करण्याचा वेळ १० मिनिटांवर येईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.