खड्डेमुक्तीचा पनवेलकरांना मनस्ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्डेमुक्तीचा पनवेलकरांना मनस्ताप
खड्डेमुक्तीचा पनवेलकरांना मनस्ताप

खड्डेमुक्तीचा पनवेलकरांना मनस्ताप

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ३० (वार्ताहर)ः खड्ड्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी नवीन पनवेल व खांदा कॉलनी या ठिकाणच्या पनवेलला जोडणाऱ्या महत्त्वाच्या दोन पुलांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. पण या कामांमुळे पनवेलमध्ये वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आहे.
नवीन पनवेल उड्डाणपूल आणि एचडीएफसी सर्कलच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सिडकोमार्फत सुरुवात करण्यात आली आहे. या पुलामुळे पनवेल तालुक्यातील नेरे आणि माथेरानकडे जाणारी शेकडो गावे, वाड्या, पाडे जोडली गेली आहेत. तसेच नवीन पनवेल-माथेरान महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे शेकडो वाहनांची येथे दररोज वाहतूक होत असते. मात्र, पावसाळ्यानंतर या रस्त्यावर खड्डे पडले असल्याने दररोज अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पुलावरील रहदारीचा विचार करता पुलाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पनवेलकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
------------------------------------
पनवेल शहरातील प्रवेशात विघ्न
पनवेलमध्ये प्रवेश करण्यासाठी वाहनचालक खांदेश्वर येथील रेल्वे पुलाचा वापर करत आहेत. तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गावरील खांदेश्वर व पनवेलला जोडणाऱ्या पुलाच्या दोन जोडमधील लोखंडीपट्ट्या बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या पुलाच्या एका मार्गिकेवर वाहतूक कोंडी होत असल्याने पनवेलमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांची कोंडी होत आहे.
------------------------------------
खांदेश्वर पुलावरून वळसा
नवीन पनवेलवरून पनवेलला येण्यासाठी पनवेल पूर्व ग्रामीण भागातील वाहनचालक खांदेश्वर पुलाचा पर्यायी मार्गाचा वापर करत आहेत. यामुळे दोन किमी अंतर वाढत आहे. त्यामुळे खांदा कॉलनी येथील पुलाचा वापर सुरू केल्याने वाहतूक कोंडीचे लोन खांदा कॉलनीपर्यंत पोहोचले आहे.