ठाणे ग्रामीणमध्ये अवतरली विकासाची गंगा

ठाणे ग्रामीणमध्ये अवतरली विकासाची गंगा

राहुल क्षीरसागर
ठाणे जिल्ह्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून एक ओळख निर्माण झाली आहे. असे असले तरी, आजही जिल्ह्यातील अनेक गावपाड्यांवरील महिलांसह लहान बालकांनादेखील पाण्यासाठी मैलोन् मैल पायपीट करावी लागत आहे. त्यात डोक्यावर हंडा घेऊन पायपीट करवी लागत असल्यामुळे त्यांना अनेक गंभीर आजारांनादेखील सामोरे जावे लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका लहान मुलांच्या शिक्षणाला बसून शाळेतील पटसंख्येवर त्याचा परिणाम जाणवू लागला होता. ही बाब लक्षात घेवून पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कंबर कसत जलजीवन मिशनच्या माध्यमातून अनेक गावपाड्यांवर प्रत्यक्ष नळाद्वारे स्वच्छ व शुद्ध पुरेसे पाणी पोहोचविण्यात पाणीपुरवठा विभागाला यश येत आहे. त्यामुळे अनेक गावपाडे पाणीटंचाई मुक्त झाली असून अनेक गावपाडे टंचाईमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. यामुळे ग्रामीण भागात गंगा अवतरल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनेचा प्रश्नदेखील ‘आ’वासून उभा ठाकला होता. त्यावरदेखील जिल्हा परिषद प्रशासनाने मात करीत, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासह सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी करीत कचऱ्याची व्हिलेवाट लावण्यात यश आले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कायापालट करण्याबरोबर स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची वाटचाल विकासाच्या दृष्टीने सुरू असून विकासाची गंगा अवतरली असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना उन्हाळाच्या काळात मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी दोन हात करावे लागत आहेत. त्यात ग्रामीण भागातील जनतेची पाणीटंचाईच्या दुष्टचक्रातून सुटका करण्यासाठी शासनासह जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असतात. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नळपाणी पुरवठा योजना आणि विहीर योजनांसह विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना मुलाबाळांसमावेत पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या माध्यामतून जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावपाड्यांकरिता जिल्हा परिषद ठाणेमार्फत २०१९ ते २०२४ या कालवधीत ७८७ गावांचा ७३० कोटी ३१ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत ६३९ कोटी ३९ लाखांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत. यामध्ये ४५९ कामे ही रेट्रोफिटिंगची असून २८० नवीन योजनांचा समावेश आहे. यापैकी ७८७ गावांचे (DPR) सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी ४४ कामे पूर्ण करण्यात आली आहेत; तर ६८९ कामे प्रगतिपथावर आहेत.
जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत २९ गावांमध्ये १०० टक्के घरगुती नळजोडणी देण्यात आलेली आहे. जलजीवन मिशन कार्यक्रम २०१९ मध्ये सुरू झाला. त्या वेळी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दोन लाख ३४ हजार ६१२ कुटुंबांची नोंद करण्यात आली होती. त्यापैकी ६६ हजार ७५ कुटुंबांना घरगुती नळजोडणी करण्यात आली होती. त्यात या योजनेची गती वाढावी, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपिट थांबावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांनी संबंधित यंत्रणांना निर्देशदेखील दिले. त्यानुसार डिसेंबर २०२२ अखेर एक लाख ४३ हजार ५१२ कुटुंबांना घरगुती नळजोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे कमी झाले असल्याचे दिसून येत आहे.
...
काल्हेरमध्ये पहिला घनकचरा व सांडपाणी प्रकल्प
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत केंद्र व राज्य स्तरावरून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्य यांनी पुढाकार घेऊन नऊ हजार ८४७ हजार घरकुले पूर्ण करण्यात आला. काल्हेर ग्रामपंचायत ही ठाणे शहरालगताची दाट लोकवस्तीची ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व्यवस्थापनाबाबतची खूप मोठी समस्या होती. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व सदस्यांनी पुढाकार घेऊन गावातील घनकचऱ्याची समस्या सोडविण्यांसाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानाने घनकचरा प्रकल्प उभा करण्यासाठी निर्धार केला. त्यानुसार प्रकल्पास जागा उपलब्ध करून अवघ्या आठ महिन्यात प्रकल्प पूर्ण केला. या प्रकल्पात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येत आहे. तसेच सुका कचरा प्रकारानुसार वर्गीकरण करून भंगार म्हणून बाजारात विकला जात आहे.
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्रामपंचायतीमधील सांडपाणी व्यवस्थापनाच्या काम हाती घेण्यात आले आहे. या ग्रामपंचायतीची लोकसंख्या (२०११ च्या जनगणनेनुसार) २२ हजार ६०८ असून प्रत्यक्षात मात्र लोकसंख्या अंदाजे ८० हजाराच्या घरात आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात सांडपाणी नाल्याचा प्रवाह २.८ एमएलडी असून कामाच्या प्रशासकीय मान्यतेची रक्कम ६१ लाख ३२ हजार ७८३ इतकी असून ३१ मार्च अखेरपर्यंत कामपूर्ण होण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे.

...........................................

नऊ हजार ८४७ हजार घरकुले पूर्ण; १५ भूमिहीनांना मिळाली हक्काची जागा
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कच्चा घरांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबीयांचे पक्क्या घराचे स्वप्न सत्यात उतरावे, यासाठी केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री घरकुल योजनेसह राज्य पुरस्कृत घरकुल योजना, महाआवास योजना राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्राणांच्या माध्यमातून या योजना राबविण्यात येत आहे. २०१६ -१७ ते २०२० -२१ या पाच वर्षांत जिल्ह्यात विविध योजनेंतर्गत आलेल्या उद्दिष्टांपैकी नऊ हजार ८४७ हजार घरकुले पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या कुटुंबीयांचे पक्क्या घरांची स्वप्नपूर्ती झाली असून स्वप्न सत्यात उतरले आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०१६-१७ ते २०२० -२१ या कालावधीसाठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण या पाच तालुक्यांसाठी सहा हजार ६८४ घरकुलांच्या प्रस्तावाला ऑनलाईन मंजुरी देण्यात आली. त्यापैकी आतापर्यंत सहा हजार ४२९ घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले असून ९६ टक्के काम पूर्ण झाले आहे; तर उर्वरित २५५ प्रलंबित घरकुले तातडीने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यातच यंदाच्या वर्षी २०२१-२२ करीता दोन हजार ८१८ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यापैकी दोन हजार २१० घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर मिळावे, बेघर आणि व्यक्तींनाही त्यांच्या हक्काची जागा उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्रपुरस्कृत पंतप्रधान आवास आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजना राबविण्यात येते. ठाणे जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकांसह नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात ही योजना राबविली जात आहे. जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या प्राधान्यक्रम यादीत मालकीची जागा नसलेले ५४ लाभार्थ्यांची संख्या समोर आली होती. यापैकी कल्याण तालुक्यातील ३९ भूमाहीन लाभार्थ्यांना महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित शहापूर तालुक्यातील खर्डी येथील १५ लाभार्थीना महाआवास अभियानच्या दुसऱ्या टप्प्यात जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनीदेखील मान्यता दिली आहे. त्यामुळे खर्डीतील त्या लाभार्थ्यांना जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
...................................
आरोग्य सुविधांचे जाळे
ठाणे जिल्ह्यात शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांमध्ये ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १९० उपकेंद्र आहेत. ग्रामीण भागात या केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधांचे जाळे निर्माण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com