उड्डाणपुलाचे स्वप्न अधुरेच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उड्डाणपुलाचे स्वप्न अधुरेच
उड्डाणपुलाचे स्वप्न अधुरेच

उड्डाणपुलाचे स्वप्न अधुरेच

sakal_logo
By

वसई, ता. ३० (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात उड्डाणपूल, रस्ते, फूटपाथ व तलाव, उद्यान सुशोभीकरणासाठी ३५४ कोटी ५८ लाखांची तरतूद केली. मात्र अद्यापही पर्यायी व्यवस्था म्हणून उड्डाण पुलांची निर्मिती करण्यात आली नाही. त्यातच नायगाव येथील बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येणारा, तसेच विरार नारंगी येथील उड्डाण पुलाचे काम रखडले आहे. यामुळे शहरवासीयांचे उड्डाण पुलाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
नालासोपारा-अलकापुरी, विरार-विराट नगर आणि वसई असे चार उड्डाण पूल प्रस्तावित आहेत. या कामाकरिता एकूण २५० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएकडून हे काम केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच वसई-विरार महापालिकादेखील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी म्हणून शहरांतर्गत उड्डाण पुलाचे जाळे तयार करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. यात विरार नारंगी उड्डाण पुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले होते. या पुलाचा काही भाग हा रेल्वेच्या हद्दीतून जात असल्याने गर्डरचे काम शिल्लक होते. नव्या वर्षात पूल रहदारीसाठी खुला होईल, अशी आशा होती. मात्र अद्याप या उड्डाण पुलाला मुहूर्त सापडला नाही. याबाबत पालकमंत्री असताना दादा भुसे यांनी देखील आयुक्तांना पत्रव्यवहार केला होता; तर दुसरीकडे नायगाव पूर्वकडील उड्डाण पुलाचे काम जैसे थे आहे. काही कारणास्तव हे काम पूर्ण होऊ शकले नसल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. एकीकडे शहरात निर्माण होणारी कोंडी पाहता नागरिकांचा जीव मेटाकुटीस आला असताना उड्डाण पूल केव्हा तयार होणार व कोंडीतून मुक्तता मिळेल याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.
----------------------
वसई-विरार शहरात गर्दीची ठिकाणे अधिक आहेत, रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, त्यामुळे रस्त्यांसह नव्या पर्यायी मार्गसाठी उड्डाण पुलाची निर्मिती केली जाणार आहे. यात नालासोपारा, विरारसह अन्य भागांत उड्डाण पूल तयार केले जाणार आहेत.
- अनिलकुमार पवार, आयुक्त
------------------
नायगाव येथे जूचंद्र उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले. कोरोनामुळे काम थांबले होते तर सध्या या पुलाचे काम काही कारणांमुळे पूर्ण होण्यास अडचण निर्माण झाली आहे. मात्र याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
- प्रशांत ठाकरे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
---------------------
येथे हवे उड्डाण पूल
आचोळे, तुळींज मार्ग, मनवेलपाडा, वसई रेंज नाका, सातिवली, माणिकपूर, अलकापुरी, सेंट्रलपार्क, विराट नगर, ओसवाल नगरी
---------------
नायगावच्या एकाच पुलाला यश
नायगाव पूर्व पश्चिम पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गावरून वसईत ये-जा करण्यासाठी नागरिकांना सोईचे झाले आहे. एमएमआरडीएने या पुलाचे काम केले. या पुलाच्या कामासाठी बविआ पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी वारंवार पाठपुरावा सुरू ठेवल्याने पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र सुरक्षा कठड्याचा अभाव असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबतही पत्रव्यवहार केले जात आहेत.
----------------------
वसई : नायगाव पूर्वेकडील उड्डाण पुलाचे काम रखडले आहे.