
कल्याणमध्ये रोटरीतर्फे हाफ मॅरेथॉन उत्साहात
कल्याण, ता. ३१ (बातमीदार) : रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणतर्फे आयोजीत केलेली हाफ मॅरेथॅान रविवारी (ता. २९) उत्साहात पार पडली. या स्पर्धेत ३, ५, १० व २१ किलोमीटर या प्रकारात मॅरेथॉन आयोजित केली होती. सुमारे २१०० पेक्षा अधिक धावपटूंनी यामध्ये सहभाग घेतला होता. ज्येष्ठ व्यक्ती, लहान मुले, सराईत तसेच नवशिके, आर्मीतील माजी कर्मचारी, दिव्यांग, अंशतः अंध आणि अनेक तृतीयपंथीही यामध्ये सहभागी झालेली होते. सतिष गुजरान, बेकी पेडी यांसारखे जगविख्यात मॅरेथॉन धावपटूही सहभागी झाले होते. कल्याणचा फिटनेस फेस्टीवल म्हणून सर्वांनी हा सोहळा गौरवला.
या वेळी सहायक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील, शरद झिने, पालिका अधिकारी, रोटरी जिल्ह्याचे गव्हर्नर कैलाश जेठानी उपस्थित होते. रोटरी दिव्यांग सेंटरच्या मदतीसाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. आत्तापर्यंत शेकडो दिव्यांग व्यक्तींना या सेंटरमध्ये कृत्रिम हात, पाय पूर्णपणे मोफत देण्यात आलेले आहेत. याच कार्याच्या खर्चास हातभार म्हणून ही मॅरेथॉन आयोजित केलेली होती. रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणच्या या समाजपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. त्यामुळे आजच्या जवळजवळ सर्व सहभागी धावपटूंनी पुढील वर्षीपण या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला.