शिशिराची पानगळ
वसंताची चाहूल

शिशिराची पानगळ वसंताची चाहूल

Published on

अजित शेडगे, माणगाव
ॠतुचक्रानुसार रूप बदलणाऱ्या रानात शुष्क असा शिशिर ऋतू सुरू झाला असून पानगळीला सुरुवात झाली आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे भारतीय ऋतू निसर्गातील विविध बदलांची नांदी देत विविध रूपे समोर आणतात. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात शिशिर ऋतू असतो. म्हणजेच डिसेंबर महिन्याचा उत्तरार्ध, जानेवारी महिना व फेब्रुवारी महिन्याच्या पूर्वार्धात शिशिर ऋतू असतो. झाडांची पानगळ सुरू झाली की शिशिर ऋतू सुरू झाल्‍याचे लक्षात येते. लांबलेल्या पावसाने यंदा निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलवून टाकले आहे, मात्र ठराविक काळानंतर येणारे ऋतुचक्र सुरू असून शिशिर ऋतूने पानगळीला सुरुवात केली आहे.
मोठ्या झाडांची पाने या ऋतूत गळतात. झाडे पूर्णपणे निष्पर्ण होतात. काहीसे भकास असं माळरानाचे चित्र या ऋतूत दिसते. निसर्गाला नवे रूप देणारा हा ऋतू शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्‍टिनेही महत्त्वाचा मानला जातो.
सध्या रानावनात, रस्‍त्‍यालगत, उद्याने, आमराई, बगिच्यांमध्ये शिशिराची पानगळ सुरू असून सर्वत्र पालापाचोळा पडलेला दिसतो. काहीसा उदास वाटणारा हा ऋतू गारावा घेऊन येतो. त्‍यामुळे या ऋतूतील सणही ऋतुमानाचा विचार करून आहार विहार देतात. मकरसंक्रांत हा त्यातीलच महत्त्वाचा सण. उत्तम आरोग्यासाठी स्निग्ध पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. या ॠतुतील पानगळ शेतकऱ्यांना राब देवून जाते. त्‍यानंतर निसर्गाला नवे अंकूर देणारा वसंताची चाहूल लागते. निष्पर्ण झालेल्या फांदीतून रंगीबेरंगी फुलांचे गुच्छ याच ऋतूच्या अखेरीस पहावयास मिळतात. एका अर्थाने नवसर्जनास पार्श्वभूमी निर्माण करणारा विरक्तीचा संदेश देणारा हा ऋतू असल्‍याचे बोलले जाते. या दरम्‍यान रानोमाळ आंब्याच्या, काजूच्या मोहोराचा घमघमाट येतो. करवंदीच्या जाळीमधून पांढरीशुभ्र फुले डोकावतात आणि पांगिरा, पळस, चाफा इ. असंख्य झाडे पुष्पगुच्छांची बरसात करतात.

पानगळ सुरू झाल्यावर लवकरच वसंत ऋतू सुरू होईल, असे जाणकार मंडळी सांगतात. शिशिर ऋतूतील वातावरण काहीसे उदासीन असते. पाणगळीमुळे रानावनात मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पसरतो. हा ऋतू नवीन पालवी फुटण्यासाठी अनुकूल असतो.
- विलास देगावकर, निसर्गप्रेमी

पाणगह ही नैसर्गिक बाब असून ज्या झाडांची पाने रुंद, लांब असतात, ती झाडे अक्षरशः निष्‍पर्ण होतात. या दिवसात झाडांच्या मुळांना पाणी पुरवठा चांगला व्हावा, या हेतूने ही क्रिया घडत असते. पानगळीचा उपयोग शेतकरी राब म्‍हणून करतात.
- भरत काळे, भूगोल शिक्षक

माणगाव ः पानगळीमुळे झाड निष्‍पर्ण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com