आगरी-कोळी बॅण्डचा रुबाब भारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगरी-कोळी बॅण्डचा रुबाब भारी
आगरी-कोळी बॅण्डचा रुबाब भारी

आगरी-कोळी बॅण्डचा रुबाब भारी

sakal_logo
By

तुर्भे ः बातमीदार
मराठी समाजात लग्नाच्या वरातीत पूर्वी टिमकी आणि ताशे तडतडायचे. त्याची जागा नंतर बँजो पार्टी, नाशिक बाजाने घेतली; तर कोळी-आगरी समाजात घोरपडीच्या चामड्याने तयार केलेला घुमट, बुलबुलमुळे रंगत येत असायची. बदलत्या काळानुसार समाजातील पारंपरिक वाद्ये इतिहासजमा होत चालली आहेत. मात्र, आगरी-कोळी बॅण्डचा रुबाब अजूनही तसाच टिकून असून पारंपरिक लोकगीतांच्या बहारदार सादरीकरणाने आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.
-----------------------------
कोळी-आगरी समाज मुळात उत्साही आणि उत्सवी. त्यामुळे कोळी-आगरी समाजाचे लग्नविधी बॅण्डच्या संगीताशिवाय पूर्ण होणारे नाहीत. उंबराचे पाणी, हळद आणि लग्न या आठवडाभर चालणाऱ्या सोहळ्यात बॅण्ड लागतो. मामा-मामी, काका-मावशीच्या घरी केळवणाला जाण्यापासून पाव्हण्यांकडे मिठाई देण्यास जाण्याच्या विधीपर्यंत बॅण्डची साथसंगत कायम असते. त्यामुळे या पथकाची बिदागी २५ हजार ते लाखापर्यंत घसघशीत असते. ब्रासबॅण्डमध्ये फिल्मी गाणी वाजवली जातात, तर कोळीबॅण्डमध्ये पारंपरिक कोळीगीत, लोकगीत वाजवणे खूप महत्त्वाचे मानले जाते. काळाच्या ओघात कोळी बॅण्डमध्येही ‌चित्रपट गीतांचा शिरकाव झाला आहे. काही निर्माते चित्रपट रिलीज करण्यापूर्वी त्यातील गाणी बॅण्डपथकांकडून वाजवून घेऊन लोकांचा अंदाज घेतात. त्यामुळेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई व रायगडमध्ये ब्रिटिश बॅण्ड इतकाच आगरी-कोळी बॅण्डदेखील लोकप्रिय आहे.
----------------------------------------------
गणवेशामुळे वेगळेपणाची छाप
कोळी, आगरी आणि ख्रिश्चन समाजातील तरुण या बॅण्डपथकात काम करतात. भलेही नवी मुंबईत ख्रिश्चन कोळी वास्तव्यास नसले तरी मुंबई, वसई याठिकाणी अधिक आहेत. बॅण्डपथकातील वाद्ये ब्रासबॅण्डसारखीच असतात. फरक असतो तो गणवेशात. या बॅण्डमध्ये काळी पँट, पांढरा शर्ट, टाय किंवा बो असा वेश असतो. या वेशामुळे आगरी-कोळी बॅण्डमधील तरुण ब्रासबॅण्ड कलाकारांपेक्षा थोडे उठावदार दिसतात.
---------------------------------------------
चार महिने आगाऊ बुकिंग
एकेकाळी विलेपार्ल्यातील इर्ला बॅण्ड अतिशय लोकप्रिय होता. त्याच धर्तीवर नवी मुंबईतील दिवाळे गावातील कोळीबॅण्डचीदेखील लोकप्रिय आहे. आजही अनेक बॅण्ड पथके कार्ल्याला एकविरा देवीच्या चरणी व्यवसायाची सुरुवात करतात. मासेमारी हा मुंबईतील कोळीवाड्यांचा प्रमुख व्यवसाय. मात्र, काही वर्षांपासून मासेमारी व्यवसाय धोक्यात आल्याने तरुण बॅण्डकडे वळला आहे. त्यामुळे काही बॅण्डपथके इतकी लोकप्रिय आहेत की, त्यांचे चार महिने आगाऊ बुकिंग होते.
--------------------------------------------
सरकारदरबारी पदरी उपेक्षाच
एकट्या वर्सोवा कोळीवाड्यातच सुमारे २० ते २५ बॅण्डपथके आहेत. मात्र, नवी मुंबईत मुंबई इतकी पथके नसली तरी बहुतेक जण हे हौस म्हणून पथकात सामील झालेत. ब्रासबॅण्ड असो किंवा कोळीबॅण्ड दोन्हीकडच्या वादकांना सरकारदरबारी कलावंत म्हणून मान्यता नाही. मात्र, एकदा वय झाले की हात चालत नाहीत, वाद्ये फुंकून वाजवण्याइतकी ताकद फुप्फुसात उरत नाही. तरुण वयात क्लॅरिनेट, सॅक्सोफोन वाजवणाऱ्यांच्या हातात मग डफली येते.
----------------------------------
नवी मुंबईत २३ पथके
दिवाळे कोळीवाडा- ३, शिरवणे- २, घणसोली- २, कोपरखैरणे- २, गोठीवली- २, दिवा कोळीवाडा- १, खैरणे बानकोडे- १, सानपाडा- १, वाशी गाव- १, सारसोळे- १, कुकशेत- १, जुईनगर- १, करावे गाव- १, बेलापूर गाव- २ आणि तुर्भे गाव- १ अशी नवी मुंबईत एकूण २३ बँड पथके आहेत; तर ७० पेक्षा अधिक बँजो पथके आहेत.
----------------------------------
बॅण्डपथकातील कलाकार असंघटित कामगारांसारखे आहेत. त्यांना कायद्याचे कोणतेही संरक्षण नाही. या कलाकारांना इतर कलावंतांसारखी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
-राजहंस टपके, कोळी समाजाचे नेते, वर्सोवा