पारंपरिक मातीच्या वस्तूंना मागणी ,यामुळे व्यवसायाला नवसंजीवनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारंपरिक मातीच्या वस्तूंना मागणी ,यामुळे व्यवसायाला नवसंजीवनी
पारंपरिक मातीच्या वस्तूंना मागणी ,यामुळे व्यवसायाला नवसंजीवनी

पारंपरिक मातीच्या वस्तूंना मागणी ,यामुळे व्यवसायाला नवसंजीवनी

sakal_logo
By

पारंपरिक माती व्यवसायाला नवसंजीवनी
नेरूळ ः बातमीदार
पूर्वीच्या काळात घरोघरी मातीच्या चुली वापरल्या जात असत. आधुनिक काळात गॅस शेगड्यांचा वापर सुरू झाल्याने मातीच्या चुलींची मागणी कमी झाली; परंतु सध्या लोखंड, प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांमुळे मातीच्या वस्तूंकडे पुन्हा माणसांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे घराच्या सजावटीमध्ये सध्या मातीच्या वस्तूंना पसंती मिळतेय. अगदी हॉलपासून ते किचनला या वस्तूंमुळे शोभा येत असल्याने पारंपरिक माती व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली आहे.
--------------------------------------
घराबाहेर पाश्चिमात्यकरणाने जागा घेतली असली तरी घर सजवण्यासाठी अद्यापही मातीच्या वस्तूंना मागणी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीविषयी जोडलेली नाळ अजूनही अनेकांच्या घरात आहे. आजी- आजोबांच्या काळापासून घर सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या या वस्तू सध्याच्या नव्या पिढीलाही घर सजावटीला अँटिक लूक म्हणून हव्या आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक गृहसजावटीसाठी मातीच्या पारंपरिक वस्तूंची मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे, आधुनिक वस्तूंच्या गराड्यात पारंपरिक भारतीय वस्तूंनी आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. सुबक आकार, त्यावर केलेलं आकर्षक कोरीव काम, मजबूतपणा अशा नावीन्यामुळे मातीच्या वस्तूंना घराघरांत पसंती मिळत आहे.
स्वयंपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चकचकीत भांड्यांना दूर सारत गृहिणी आता पारंपरिक मातीच्या भांड्यांमध्ये भाजी शिजवण्यास, खापराच्या खापरीवर पोळी भाजण्यास पसंती देत आहेत. त्याचबरोबर घर सजवण्यासाठी मातीचे शोपीस, हँगिंग अशा वस्तूंकडे अधिक ओढा आहे. मातीचा माठ, रांजण, सुरई याबरोबरच दिवा लावणी, पातेलं, शोभेच्या वस्तू अशा अनेक वस्तू घरांत आणण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे घराला पारंपरिक लूक तर मिळतोच; शिवाय सौंदर्यातही भर पडत आहे.
---------------------------
कुल्लड
घरी आलेल्या पाहुण्यांना कुल्लडमध्ये चहा दिला जात आहे. अनेक चहाच्या दुकानांमध्ये, हॉटेलमध्ये लस्सी, चहा, मलाई, रबडी इत्यादी मातीच्या भांड्यात दिले जात आहे. यामुळे खवय्यांनादेखील याचे आकर्षण वाढले आहे. कपमध्ये कितीही निराळे प्रकार आले तरी कुल्लडची मजा वेगळीच आहे. २०० रुपयांपासून पुढं आकर्षक किमतीत कुल्लड बाजारात मिळतात. याचबरोबर मातीच्या प्रकारातील चहाची किटली आणि बशीही मिळते.
---------------------------------
पिगी बँक
प्रत्येक चिमुकला पैसे जमवण्यासाठी पिगी बँकला पसंती देतो. मातीच्या या पिगी बँकही बाजारात अत्यंत सुबक आकारात आणि मुलांना आकर्षित करतील, अशा प्रकारांमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर ऑनलाईन साईट्सवरही याचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. साधारणपणे १५० रुपयांपासून पुढं आकार आणि डिझाईननुसार याच्या किमती आहेत.
---------------------------------------
क्ले-हँगिंग
हॉलमध्ये किंवा बाल्कनीत लावण्यासाठी क्ले-हँगिंगला पसंती मिळत आहे. काही क्ले-हँगिंगमध्ये दिवा ठेवण्याची सोयही असल्यानं रात्रीच्या वेळी हा प्रकार अतिशय सुंदर दिसतो. त्याचप्रमाणे त्याला मातीच्याच बेल्सही (घंटासमान) जोडलेल्या असल्यानं वाऱ्याबरोबरच येणाऱ्या ध्वनींमुळे वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते. क्ले-हँगिंग हे ४०० रुपयांपासून पुढं बाजारात उपलब्ध आहेत. गृहसजावटीमध्ये क्ले-हँगिंग हा उत्तम पर्याय आहे.
------------------------------------
खापराची खापरी
चपाती, पुरणपोळी करण्यासाठी गृहिणी मातीच्या खापरीला (तवा) पसंती देत आहेत. लोखंडी तवा, नॉनस्टीक तवा यावर पोळी भाजण्यापेक्षा पारंपरिक खापराची खापरी यासाठी वापरली तर त्याची चव अतिशय सुंदर लागते. ग्रामीण भागात या खापरीचा वापर नेहमीचा असला तरी शहरी भागात मात्र तव्याचा हा प्रकार अगदीच दुर्लक्षित आहे. मात्र, भारतीय संस्कृतीतील विशेष वस्तूंना बाजारात पुन्हा स्थान निर्माण झाल्यानं किचनमध्येही खापराची खापरी गृहिणींचे आकर्षण ठरली आहे.
----------------------------------
रुखवतासाठी वेगळा पर्याय
लग्नसराई सतत सुरू असल्यामुळे नवरी मुलीला रुखवतात छोटी चूल, जाते, छोटी भांडी यांना सुंदर असा रंग देऊन मातीच्या भांड्यांना
आकर्षित केले आहे. यामुळे लग्नसराईतदेखील मातीच्या वस्तूंना मागणी आहे.
----------------------------------
मातीची भांडी
तवा, टोप, चमचा अशा आकारात मातीची भांडी आली आहेत. त्याचबरोबर चिकन, मटण, बिर्याणी भरलेलं वांगं असे पदार्थ करण्यासाठी लोक मातीच्या भांड्यांचा वापर करू लागले आहेत. यामुळे खाणाऱ्यांनादेखील पारंपरिक अन्नाचा स्वाद घेतल्याचा अनुभव घेता येत आहे.