
सरपंचांकडून सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण
भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील गोडाऊन परिसरातील मौजे वेहेळे-भाटाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा माळी व त्यांचे पती रमाकांत माळी यांनी सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून सदर रस्ता सार्वजनिक वाहतुकीस मनमानीने बंद केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी वेहेळे-भाटाळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या पल्लवी पाटील यांनी एका निवेदनाद्वारे ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
भिवंडी तालुक्यातील गोडाऊन हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात मौजे वेहेळे-भाटाळेच्या महिला सरपंच पूजा माळी व त्यांचे पती रमाकांत माळी यांनी वेहेळे-भाटाळे येथील सार्वजनिक रस्ता त्यांच्या वैयक्तिक कामासाठी कुंपण लावून बंद केला आहे. हा रस्ता मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित असून हा रस्ता बंद केल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. ग्रामस्थांना अन्य पर्यायी रस्ता नसल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. या निवेदनाच्या प्रती आवश्यक कार्यवाहीस्तव भिवंडीचे उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व तहसीलदार भिवंडी यांना देण्यात आल्या आहेत.
---------------
मौजे वेहेळे-भाटाळे ग्रामपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक रस्ता बंद केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- अधिक पाटील, तहसीलदार, भिवंडी