
मुंबईकरांसाठी आरोग्यम् कुटुंबम् योजना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबई उपनगरामध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींची टक्केवारी ही राज्याच्या आणि देशाच्या सरासरी आकडेवारीपेक्षाही अधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून आढळून आले आहे. या व्यक्तींपर्यंत पोहचण्यासाठी ‘आरोग्यम् कुटुंबम् योजना’ यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आली आहे. सर्वसमावेशक दक्षता कार्यक्रम या योजनेअंतर्गत सूचवण्यात आला असून यासाठी १२ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर आठवड्यातून एक दिवस मधुमेह आणि रक्त तपासणीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
एनएफएचएस ५ सर्वेक्षणानुसार मुंबईत प्रत्येक ४ पैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि प्रत्येक पाचपैकी एका व्यक्तीला मधुमेह आहे. मुंबई महापालिकेने अलिकडेच केलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या स्टेप्स सर्वेक्षणानुसार मुंबईत ३४ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब आणि १८ टक्के लोकांमध्ये मधुमेह आढळून आला आहे.
योजनेची पार्श्वभूमी
उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रूग्णांना केवळ अकाली मृत्यूचाच धोका नसतो, तर त्यांच्या हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग, पक्षाघात, मूत्रपिंडाचे आजार आणि डोळ्यांच्या समस्यांची गुंतागुंतही उद्भवू शकते. त्यामुळे रक्तदाब आणि मधुमेह यासारख्या आजाराच्या धोक्याला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेला याबाबतची चिंता पत्र लिहून व्यक्त केली होती. या पत्राची दखल घेऊनच मुंबई महापालिकेने आरोग्यम् कुटुंबम् ही योजना हाती घेतली आहे.
असे होणार काम
आरोग्यम् कुटुंबम् कार्यक्रमाअंतर्गत वस्ती पातळीवर पूर्व तपासणी करणे, जागरूकता करणे, निरोगी जीवनशैलीला चालना देणे, नवीन उपचार पद्धतीचा अवलंब करणे तसेच रूग्णांकरिता दक्षता आणि देखरेख प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे आशा सेविका आणि आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून या रूग्णांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.
आठवड्यातील बुधवार राखिव
मुंबई महापालिकेने एकुण १६ रुग्णालयांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी केंद्र सुरू केली आहेत. मुंबई महापालिकेच्या प्राथमिक व्यवस्थेमार्फत आरोग्य स्वयंसेविका आणि आशा सेविका, झोपडपट्टी आणि वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन ३० वर्षांवरील व्यक्तींची रक्तासंबंधी तपासणी करतील. आठवड्यातील एक दिवस (बुधवार) या तपासणी कार्यक्रमासाठी राखून ठेवण्यात आला आहे. त्यासाठी उच्च रक्तदाब उपकरणे आणि कीटदेखील पालिकेने खरेदी केली आहे.