पनवेलमध्ये हिंदू-मुस्लिम एेक्याचे प्रतिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये हिंदू-मुस्लिम एेक्याचे प्रतिक
पनवेलमध्ये हिंदू-मुस्लिम एेक्याचे प्रतिक

पनवेलमध्ये हिंदू-मुस्लिम एेक्याचे प्रतिक

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ४ (वार्ताहर)ः चारशे वर्षांची एकतेची परंपरा जपणाऱ्या हजरत ख्वाजा पीर करीमअली शाह बाबा दर्गा उरुसाची सांगता झाली. पनवेलच्या सर्वधर्मीय श्रद्धेला जपणाऱ्या हजरत ख्वाजा पीर करीमअली शाह बाबा दर्गा उरुसानिमित्त हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक पाहावयास मिळाले.
पनवेलमध्ये आध्यात्मिकतेची मोठी परंपरा आहे. आजच्या विविध धर्म-समाजाची घट्ट वीण त्यामुळे आहे. १७४७ साली हजरत पीर करीमअली शाह चिश्ती नावाने या दर्ग्याची स्थापना झाली होती. मुख्य महामार्गावर सुप्रसिद्ध पंचमुखी हनुमान मंदिर, दर्ग्याजवळ गावदेवी मंदिर, अक्कलकोट स्वामी आश्रम, बल्लाळेश्वर व वीरुपाक्ष शिव मंदिरे, साईबाबा मंदिर अशी अनेक धार्मिक ठिकाणे सर्वांनाच एकमेकांच्या मनात श्रद्धाभाव वाढवतात. पीर करीमअली बाबांची कृपा आहे. सर्वधर्मीय लोकांची श्रद्धा यावर आहे. या वर्षी हा कार्यक्रम अधिक जाणीवपूर्वक सर्व समाजाला प्रेरणादायी होईल, असा आमचा प्रयत्न राहील, असे मत सय्यद अकबर यांनी मांडले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कादबाने यांनी त्यांच्या कारकिर्दीत पनवेल शांतता आणि सौहार्द जपून खेळीमेळीच्या वातावरणात राहत असल्याचे कौतुक केले.
-----------------------------------------------
राज्यभरातून भाविकांची उपस्थिती
पनवेलच्या आध्यात्मिक परंपरेच्या या उत्सवात असंख्य लोकांचे योगदान असते. यंदा सालाबादप्रमाणे संदल, महाप्रसाद आणि विविध कार्यक्रम याच्या नियोजनामधून उरूस झाला. पनवेलकरांसह जिल्हा व राज्यभरातून येणाऱ्या भाविकांनी परंपरेप्रमाणे मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.