
नाट्यगृहाच्या छतावर गर्डर
अंबरनाथ, ता. ६ (बातमीदार) : अंबरनाथ नगरपालिकेच्या नियोजित नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर असून, नाट्यगृहाच्या इमारतीवर छतासाठी मोठ्या आकाराचे गर्डर बसविण्यासाठी २०० टन क्षमतेच्या क्रेनची मदत घेण्यात आली.
अंबरनाथ नगरपालिकेने आरक्षित भूखंडावर तब्बल २३ कोटी रुपये खर्च करून नाट्यगृह उभारण्याचे काम हाती घेतले आहे. मे २०२३ पर्यंत नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून त्या अनुषंगाने कामाला वेग देखील देण्यात आला आहे. आरसीसी बांधकाम पूर्ण झाले असून रंगमंचाच्या वरच्या बाजूला भव्य छत उभारले जाणार आहे. छत उभारण्यासाठी रंगमंचाच्या वरच्या बाजूस भले मोठे गर्डर टाकण्यात आले आहेत. हे गर्डर उचलून नियोजितस्थळी बसवण्यासाठी मोठी क्रेन मागवण्यात आली होती. क्रेनच्या मदतीने शनिवारी गर्डर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. संपूर्ण प्रकल्पात सर्वात महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक काम गर्डर बसवण्याचे असल्यामुळे प्रकल्प अधिकारी राजेंद्र हावळ आणि अभियंता सुनील जाधव या दोन्ही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये काम गर्डरचे काम पूर्ण करण्यात आले.
विविध सुविधा उपलब्ध
नाट्यगृहात ५०८ आसन क्षमता आहे. कॅफेटेरिया, कॉन्फरन्स हॉल, व्हीआयपी कक्ष, कार्यालय कक्ष, बुकिंग सेंटर, किचन आणि स्वच्छतागृहाचाही यामध्ये समावेश आहे. नाट्यगृहाच्या तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, त्यात २५० दुचाकी आणि ८० हून अधिक चारचाकी गाडी पार्क करण्याची क्षमता तयार करण्यात आली आहे.