शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांना फटका
शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांना फटका

शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांना फटका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६ : रायगड जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यांमध्ये आधीच शिक्षकांची कमतरता आहे, त्यात आंतर जिल्हा बदल्‍यांमुळे शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदलीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. जिल्ह्यात आधीच जवळपास एक हजार २०० पदे रिक्त आहेत. सरकारच्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीतून २४९ शिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची मागणी करीत आहेत, तर त्याच वेळेस केवळ ५४ शिक्षक जिल्ह्यात येण्यास इच्छुक आहेत. यामुळे भविष्यात रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा हा एकमेव पर्याय आहे. जिल्ह्यात प्राथमिक विभागाच्या सुमारे अडीच हजार शाळा आहेत. काही ठिकाणी चौथी तर काही ठिकाणी सातवीपर्यंतच्या शाळा आहेत. अनेक ठिकाणी एकशिक्षकी शाळा तर अनेक ठिकाणी चार ते पाच वर्गांना दोनच शिक्षक आहेत. त्यामुळे शिक्षणाचा दर्जाही सुमार राहत आहे.
सात-आठ वर्षांपासून आंतरजिल्हा बदली जिल्ह्यात थांबली होती. मात्र आता २ डिसेंबर रोजी सरकारने आंतरजिल्हा बदलीसाठी जाणाऱ्या शिक्षकांना कार्यमुक्‍त करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात २४९ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करण्यात आली होती; मात्र, त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. या शिक्षकांची चालू शैक्षणिक वर्ष संपताच प्रवर्ग-१, प्रवर्ग-२ आणि सर्वसाधारण वर्गातील शिक्षकांची टप्प्याटप्प्याने कार्यमुक्त केले जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकच राहणार नाही. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांची चणचण भासणार असून परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भवितव्याच्या प्रश्न उपस्थित होणार आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती; परंतु जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रक्रियेला विरोध केल्याने ती थांबली होती. पोलादपूर, म्हसळा, तळा, श्रीवर्धन या तालुक्यांमधील शिक्षक बदली करून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास तयार आहेत. यामध्ये २०१७ ते २२ आंतरजिल्हा बदलीसाठी जिल्ह्यातील कार्यरत शिक्षकांनी ऑनलाईन मागणी केलेली आहे. एकाच वेळेला संपूर्ण राज्यात होणाऱ्या बदली प्रक्रियेची अंमलबजावणी केली जाते. या प्रक्रियेत रायगड जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातील शिक्षक येण्यास तयार नसल्याने येथील दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षकांची चणचण भासणार आहे.

राज्यशासनाच्या आदेशानुसार ही बदली प्रक्रिया सुरू आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेमुळे जिल्ह्यात कमतरता भासणाऱ्या शिक्षकांची पदे नव्या भरती प्रक्रियेतून भरण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात ११०० ते १२०० शिक्षकांची पदे रिक्त आहेत.
- पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग