एका कुटुंबातील तीन महिलांना किडनीचा जडला विकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एका कुटुंबातील तीन महिलांना किडनीचा जडला विकार
एका कुटुंबातील तीन महिलांना किडनीचा जडला विकार

एका कुटुंबातील तीन महिलांना किडनीचा जडला विकार

sakal_logo
By

फेअरनेस क्रिमचा किडनीवर दुष्परिणाम
एका कुटुंबातील तीन महिलांना किडनीचा जडला विकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महिलांनो सावधान...! अकोल्यात राहणाऱ्या एकाच घरातील तीन महिलांना गोरं होण्यासाठी वापरलेल्या फेअरनेस क्रिममुळे किडनीचा विकार जडला आहे. या तीनही महिलांनी मेकअपसाठी एकच फेअरनेस क्रिम वापरले होते. दोन तरुण मुली आणि त्यांची आई या तिघींनाही या फेअरनेस क्रिमचा दुष्परिणाम भोगावा लागला. फेअरनेस क्रिममध्ये असणाऱ्या मर्क्युरी (पार)चे प्रमाण वैज्ञानिकदृष्ट्या १ पीपीएमच्या खाली असणे गरजेचे असते, पण भारतातील जवळपास ४० ते ५० टक्के क्रिम्समध्ये मर्क्युरीचे प्रमाण हजार पीपीएमपर्यंत असते. हा पारा त्‍वचेवाटे शरीरात मुरत जाऊन त्‍याचा परिणाम विविध अवयवांवर होऊ लागतो. या महिलांच्‍या बाबतीत हा परिणाम किडनीवर झाला आहे.
अकोल्याच्या कुटुंबातील एका २० वर्षीय बायोटेक या प्रोफेशनमध्ये असणाऱ्या मुलीने चेहरा उजळावा म्हणून तिच्या ब्युटिशियनकडून एक फेअरनेस क्रिम विकत घेतली. तिचा चेहरा त्या क्रिममुळे उजळू लागला. लोकांनी तिच्या सौदर्यांची स्तुती करणे सुरू केले. याच पार्श्वभूमीवर मुलीची २३ वर्षीय बहीण आणि ४५ वर्षीय आईनेही ती क्रिम वापरण्यास सुरुवात केली, पण त्यांचा चेहरा उजळण्याचा आनंद फार काळ टिकला नाही. २०२२ मध्ये ही फेअरनेस क्रिम या तिघींनी वापरण्यास सुरुवात केली होती, चार महिन्यांनंतर त्यांना किडनीचा ग्लोमेरुलो नेफ्राईटीस हा आजार झाला. किडनीच्या फिल्टर्सना येणारी सूज म्हणजेच ग्लोमेरुलो नेफ्रिटीस हा तरुण वयोगटात आढळणारा किडनीचा आजार भारतात किडनी निकामी होण्याचे महत्त्वाचे कारण आहे.
या तिन्ही महिलांनी अकोल्यातील किडनी विकारतज्ज्ञांची भेट घेतली होती. किडनी विकारतज्ज्ञ डॉ. अमर सुलतान यांनी त्यांच्या किडनीच्या समस्येविषयी केईएम रुग्णालयातील मूत्रपिंड विभाग प्रमुख डॉ. तुकाराम जमाले यांच्याशी ऑनलाईन सल्ला घेतला. शिवाय त्यांच्या फेअरनेस क्रिमचा नमुना केईएम रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवला. त्यातून त्यांना फेअरनेस क्रिममध्ये असलेल्या मर्क्युरी (पाऱ्याचे प्रमाण) हजार पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) आढळले. या तीन महिलांपैकी दोघींची प्रकृती ठिक आहे, तर एकीच्या किडनीला गंभीर इजा झाल्याने अकोल्यातच ओपीडी पातळीवर उपचार सुरू आहेत.

अकोल्यातील डॉक्टर अमर सुलतान यांनी किडनीच्या सर्व तपासण्या केल्या. महिलांनी वापरलेल्‍या फेअरनेस क्रिमची तपासणी येथे केली गेली. प्राचीन काळात जेव्हा सोन्याची खाण खणली जायची तेव्हाही अनेकदा किडनीचे विकार व्हायचे. हा आजार सामान्य असला तरी फेअरनेस क्रिम वापरण्यापेक्षा पौष्टिक आहार घ्यावा. जेणेकरून त्याचा दुष्परिणाम होणार नाही.
- डॉ. तुकाराम जमाले, मूत्रपिंड विभाग प्रमुख, केईएम रुग्णालय