
जिल्हा कृषी महोत्सव कामोठ्यात रंगणार
नवीन पनवेल, ता. ७ (वार्ताहर) : दोन वर्षांपासून कृषी महोत्सवापासून दुरावलेले शेतकरी आता थेट पनवेल तालुक्यातील कामोठ्यात ग्राहकवर्ग जोडण्यास येणार आहेत. राज्य जिल्हा कृषी विभाग व आत्मा रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत पाचदिवसीय रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन खांदेश्वर रेल्वेस्थानकासमोरील मैदानावर करण्यात आले आहे. यात सुमारे दीडशे स्टॉल्स उभारले जाणार असून शेतकऱ्यांना आपले उत्पादन थेट विकता येणार आहे. त्यामुळे या कृषी महोत्सवाला शेतकरी व नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.
मागील दोन वर्षांत राज्यात सर्वत्र कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन केले नव्हते. सद्यस्थितीत कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात असल्याने कृषी महोत्सव राबवण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार यंदा रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या विविध कृषी योजना / उपक्रमाची माहिती, कृषी तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण प्रगतशील शेतकऱ्याचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषिपूरक व्यवसाय, आदींचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे. कृषी प्रदर्शन, कृषीविषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी उद्योजकांची व्याख्याने, यशस्वी शेतकरी, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ व विचारवंत यांची भेट घडावी आणि सामान्य शेतकऱ्यांना शंका निरसन करून घेता यावे, उत्पादन ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारित धान्य व खाद्य महोत्सव, फळे-फुले व भाजीपाला महोत्सव आदींसाठी रायगड जिल्ह्यात दरवर्षी कृषी महोत्सव भरवला जातो. या वर्षी ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत खांदेश्वर रेल्वेस्थानकासमोरील मैदानात हा महोत्सव होणार असून राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उद्घाटन हस्ते होणार आहे. महोत्सवात शेतकऱ्यांना थेट शहरी ग्राहकांशी संवाद साधता येणार आहे. यासाठी दीडशे स्टॉल्स उभारले जाणार आहेत. कृषी महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम होणार असून नागरिक आणि शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन उज्ज्वला बाणखेले यांनी केले आहे.
कृषी प्रदर्शनाचा उद्देश
१. कृषीविषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे.
२. शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार-शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण.
३. समूह गट संघटित करून स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे.
४. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री.
५. कृषीविषयक परिसंवाद/व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाण-घेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे.
६. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी करावयाच्या उपायोजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे.
वैशिष्ट्ये
* भव्य तांदूळ व धान्य महोत्सव
* भाजीपाला विक्री दालने, सेंद्रिय शेतकरी गटाचे विक्री दालने
* शेतकऱ्यांसाठी विविध नावीन्यपूर्ण विषयांचे परिसंवाद व चर्चासत्रे
* कृषी विभाग व संलग्न विभागाच्या योजनांची सादरीकरण इ. गोष्टींचा समावेश