विधवा महिलांच्या सन्मानासाठी एक पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधवा महिलांच्या सन्मानासाठी एक पाऊल
विधवा महिलांच्या सन्मानासाठी एक पाऊल

विधवा महिलांच्या सन्मानासाठी एक पाऊल

sakal_logo
By

विरार, ता. ७ (बातमीदार) : आशादीप संघटनेचा वार्षिक स्नेहमेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास वसईतील सुमारे ४०० विधवा माता, भगिनी उपस्थित होत्या. आशादीप संघटना ही वसईमध्ये गेली ३३ वर्षे विधवा भगिनींसाठी कार्य करीत आहे. विधवा माता, भगिनींना समजात सन्मानाने जगता यावे, समाजात, कुटुंबात, लग्न, उत्सव, सोहळे या ठिकाणी त्यांना सक्रिय सहभाग मिळावा, यासाठी अशादीप संघटनेद्वारे वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हा मेळावा वसईतील वायएमसीए हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी हॉलचे सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, स्वयंपाकी, वाहनचालक, फोटोग्राफर व ध्वनी संयोजक यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
आशादीप संघटनेचे संचालक फादर लिओ फरगोज यांनी प्रास्ताविक केले. समाजातील दुर्लक्षित व वंचित, विधवा महिलांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. समाजातील चालीरीती, रुढी, परंपरा यामुळे आजही थोड्याफार प्रमाणात विधवा माता भगिनींकडे दुय्यम दृष्टीने पाहिले जाते. काही वेळा कुटुंबात व नातेवाईकांकडून खूप बंधने लादली जातात; मात्र या आव्हानाना तोंड देत आज अनेक विधवा महिला विविध क्षेत्रात प्रभावीपणे नेतृत्व करीत आहेत. यासाठी अशा प्रकारचे मेळावे आपला आत्मविश्वास बळकट करीत असतात. त्याद्वारे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मानाने जगता आले पाहिजे, असे प्रतिपादन फादर लिओ यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले.

-----------------
पथनाट्य सादरीकरण
मेळाव्याच्या पहिल्या सत्रात ‘स्त्री शक्ती’ या विषयावर जुराण लोपीस व सहकारी यांनी पथनाट्य सादर केले. उपस्थित महिलांमधून काही जणांनी आपले अनुभव कथन केले. पती निधनानंतरचे दु:ख, कौटुंबिक व सामाजिक बंधने यांच्याशी कशा प्रकारे त्या सामोऱ्या गेल्या, याबद्दल मनोगत मांडले. दुसऱ्या सत्रात मिना परेरा व फादर नीलम लोपीस यांनी मेळाव्यातील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. समारोपाच्या सत्रात आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी पवित्र मिस्सा अर्पण करून उपस्थित महिलांना नव्या आशेने व नव्या उमदीने जगण्यासाठी प्रबोधन केले.