
कल्याण डोंबिवलीचा फेरीवाल्यांनी श्वास कोंडला
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानक परिसर हा जणू पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांना आंदण दिला आहे, अशा पद्धतीने फेरीवाले या परिसरातील रस्ते, पदपथ अडवून सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करतात. स्थानक परिसरात होणारी कोंडी टाळण्यासाठी सदर भागातील फेरीवाले हटविण्याची कारवाई अनेकदा झाली. पालिका आयुक्त कारभार हाती घेताच सुरुवातीला स्टेशन परिसरात भेट देत कारवाईचे आदेश देतात. नंतर मात्र ही कारवाई थंडावल्याचे दिसून येते. आजही स्टेशन परिसर या फेरीवाल्यांच्या कोंडीत अडकला असून मोकळा श्वास कधी घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कल्याण, डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. स्टेशन भागातील कोंडी टाळण्यासाठी स्टेशन परिसरात १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसू देऊ नयेत, असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यानुसार या भागात फेरीवाले बसू नये, म्हणून पालिका आयुक्तांनी कल्याण डोंबिवलीमधील दहा प्रभागातील सहायक आयुक्तांना फेरीवाले हटविण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमणविरोधी पथक या फेरीवाल्यांवर कारवाई करते; परंतु कर्मचारी, अधिकारी यांचे फेरीवाल्यांसोबत साटेलोटे असल्याने फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचा आरोप पहिल्यापासून होत आहे. या आरोपांचे खंडन अद्यापपर्यंत पालिका प्रशासनाला करता आलेले नाही, हे सत्य आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन हे जंक्शन तर डोंबिवली हे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. यामुळे या भागात प्रवाशांची गर्दी असते. स्थानकाबाहेरच रिक्षा आणि फेरीवाल्यांचा विळखा पडल्याचे दिसून येते. स्टेशन परिसरातील कोंडी टाळण्यासाठी स्कायवॉकची उभारणी करण्यात आली; मात्र या स्कायवॉकवरदेखील फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले. कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यात रिक्षा, बस, दुचाकी यांचा पडलेला वेढा आणि उर्वरित जागा फेरीवाल्यांनी व्यापल्याने प्रवाशांना चालण्यास जागा उरत नाही. ही कोंडी फोडण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने वाहतूक बदल, कारवाई यांसारखे अनेक प्रयत्न केले मात्र ते असफल ठरले.
माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच तत्कालीन आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी फेरीवाल्यांवर वचक निर्माण करण्यासाठी आयुक्त पदाचा पदभार हाती घेताच, स्टेशन परिसरात सकाळी अथवा रात्री धाड टाकत सहायक आयुक्तांना धारेवर धरत दम भरला होता. आयुक्तांच्या या कारवाईमुळे फेरीवाल्यांवर काही तरी वचक बसेल असे वाटत असतानाच दोन्ही आयुक्तांच्या कार्यकाळात या कारवाया पुढे थंडावल्याचे दिसून आले.
फेरीवाल्यांना पर्यायी जागा देणे हा प्रश्न गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. फेरीवाल्यांविषयी तक्रार येताच अधूनमधून कारवाई केली जाते. काही भागातील फेरीवाल्यांवर राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचे बोलले जाते. तसेच आपल्या भागात फेरीवाल्यांना बसू देण्यासाठी देखील पालिका अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव येतो. पालिका अधिकारी देखील साटेलोटे करून या जागा फेरीवाल्यांना देतात. यामुळे वर्षानुवर्षे कल्याण-डोंबिवली शहराचा श्वास फेरीवाल्यांमुळे कोंडला गेला आहे.