
स्कायवॉकवर गळफास घेत तरुणाची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : कल्याण स्थानक परिसरातील स्कायवॉकवर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता. ७) पहाटेच्या सुमारास घडली. विठ्ठल मिसाळ (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून आंबिवली येथे तो राहत होता. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून महात्मा फुले चौक पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.
मूळचा बीड येथील रहिवासी असलेला विठ्ठल हा आंबिवली येथे बहीण व भावोजी यांच्यासोबत राहत होता. त्याने मंगळवारी पहाटे भावोजी जालिंदर चौरे यांना ‘मला जगण्याचा कंटाळा आला आहे. मी आत्महत्या करत आहे,’ असे कॉल करून सांगितले. तसेच जालिंदर यांची पत्नी प्रिया हिला देखील व्हिडीओ कॉल करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले. प्रिया यांनी विठ्ठल हा कल्याण स्थानक येथे आत्महत्या करत असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत विठ्ठलने गळफास घेतला होता. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांच्या साह्याने विठ्ठलला खाली उतरवण्यात आले. त्याला उपचारासाठी रुक्मिणी बाई रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. जालिंदर यांच्या फिर्यादीनुसार महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.