साठीनंतर न्यायहक्कांसाठी लढा

साठीनंतर न्यायहक्कांसाठी लढा

तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : सिडको महामंडळाच्या बंद पडलेल्या बीएमटीसी परिवहन सेवेला ९ फेब्रुवारीला ३९ वर्षे पूर्ण होत आहेत; पण या इतक्या वर्षात कामगारांच्या मागण्या सिडको प्रशासनाने मान्य केल्या नसल्यामुळे पदरी उपेक्षाच पडली आहे. वयाच्या साठीनंतरही बीएमटीसी कामगारांना मोबदल्यासाठी शासनदरबारी जोडे झिजवावे लागत असून बेरोजगारीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मुंबईच्या बेस्टच्या धर्तीवर १९७४ मध्ये सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती करताना बीएमटीसी परिवहन सेवा सुरू केली. उरण, पनवेल, नवी मुंबई आणि दादर या ठिकाणी बीएमटीसी प्रवासी सेवा देत होती. यामध्ये ९० टक्के कामगार वर्ग हा स्थानिक भूमिपुत्र होता. त्या वेळी बीएमटीसीतील नोकरी म्हणजे सोन्याचे दिवस मानले जात होते. त्यामुळे सर्वाधिक तरुण वर्ग प्रतिष्ठेच्या अशा सिडकोच्या बस सेवेत कामाला लागत होता; पण ९ फेब्रुवारी १९८४ मध्ये ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे १५८७ कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता; तर अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळल्यामुळे बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांना सिडकोने मोबदला द्यावा, यासाठी गेली ३९ वर्षे कामगार न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहेत.
------------------------------------
फक्त आश्वासनांची खैरात
- बीएमटीसी कामगार किंवा त्यांच्या वारसांना नवी मुंबईमध्ये १०० चौरस फूट आकाराचे दुकानाचे गाळे किंवा भूखंड देण्याचा ठराव सिडकोच्या संचालक मंडळाने १० जुलै २०१३ रोजीच्या ठरावानुसार बैठकीत मंजूर केला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाचे तत्कालीन उपसचिव एस. के. सालेमठ यांनी ९ सप्टेंबर २०१४ च्या मंजुरी पत्रानुसार हा निर्णय जाहीर केला. परंतु, शासनाचा आदेश असतानाही आजपर्यंत सिडकोने या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.
- कामगारांच्या लढ्याबाबत आवाज उठवला जावा, यासाठी हिवाळी अधिवेशनातदेखील काही कामगारांनी स्थानिक आमदारांना थेट नागपूर गाठून आपले प्रश्न अधिवेशनात चर्चेत घ्यावे अशी गळ घातली होती. त्यानुसार कामगारांना शासनाने मंजूर केल्याप्रमाणे १०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानांच्या गाळ्याचे विनाविलंब तातडीने वितरण करावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.
-------------------------------------------
बीएमटीसीच्या मोबदल्याच्या आजही आम्ही प्रतीक्षेत आहोत. वयाची ६० पार होऊनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे विविध आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. सिडकोने आमच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे.
- मेघश्याम पाटील, कामगार, नेरूळ गाव
--------------------------------
सिडकोने खूप अन्याय केला असून आजही आम्हाला योग्य मोबदला देण्यात आला नाही. सेवानिवृत्त होऊनही मोबदला मिळाला नाही. आमच्यातील काही जण आज हयात नाहीत. किमान आता तरी न्याय मिळावा, अशी आशा आहे.
- नरेश पाटील, गोठिवली गाव
---------------------------------
बीएमटीसी बस सेवा बंद होऊन आता ३९ वर्षे झाली; पण आमच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. वारंवार पाठपुरावा करूनदेखील न्याय मिळत नाही. आज बघायला गेले तर सिडको तुपाशी व कामगार उपाशी म्हणावे लागेल.
- जगन्नाथ पाटील, बोनकोडे गाव
-----------------------------------
सिडकोच्या या भूमिकेविरोधात बीएमटीसी कामगारांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. या विषयाची तत्परतेने गंभीर दखल घेऊन शासनाने गाळेवाटपाबाबत घेतलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश शासनाने सिडको महामंडळाला द्यावेत.
- गणेश नाईक, आमदार, भाजप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com