चलनवाढीचा अंदाज सुधारला

चलनवाढीचा अंदाज सुधारला

Published on

मुंबई, ता. ८ ः पुढील आर्थिक वर्षासाठीच्या चलनवाढीचा अंदाज रिझर्व्ह बँकेने सुधारल्याने आर्थिक वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करता देशावरील परकीय कर्जही मर्यादेतच असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास म्हणाले. येत्या आर्थिक वर्षात चलनवाढ ५.३ टक्के राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. मात्र, आधीचा त्यांचा अंदाज ६.५ टक्के होता. यावर्षीच्या एप्रिल ते जून या तिमाहीत चलनवाढ पाच टक्के राहील. तर जुलै ते सप्टेंबर आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या दोनही तिमाहींमध्ये चलनवाढ ५.४ टक्के राहील. जानेवारी ते मार्च २०२४ या तिमाहीत चलनवाढ ५.६ टक्के राहील, असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे.

परदेशातून भारतात येणाऱ्या पर्यटकांना विविध प्रकारची पेमेंट करण्यासाठी यूपीआयचा वापर करण्यास परवानगी देण्याचा रिझर्व बँकेचा प्रस्ताव आहे. सध्या केवळ जी-२० देशांमधून येणाऱ्या परदेशी पर्यटकांना भारतातील विशिष्ट विमानतळांवरच ही सेवा मिळू शकेल. पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज (ता.८) येथे ही माहिती दिली. किरकोळ डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय सेवा अत्यंत लोकप्रिय होत आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या साऱ्याच पर्यटकांना ही सेवा देण्याचा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे, असे ते म्हणाले.
----
नाणी देणारी यंत्रे
देशातील बारा शहरांमध्ये क्यू आर कोडच्या आधारे नाणी देणारी यंत्रे लावण्याचाही प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर रिझर्व बँक लागू करणार आहे. सुरुवातीला देशातील बारा शहरांमध्ये अशी नाणी देणारी यंत्रे लावली जातील. नागरिकांना यूपीआय पेमेंट यंत्रणेमार्फत क्यू आर कोड स्कॅन केल्यावर ही नाणी मिळतील.
----
परकीय गुंतवणूक चांगली
देशातील परकीय गुंतवणुकीचा ओघ उत्तम असून आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करता भारताचे परदेशी कर्जाचे प्रमाण देखील कमीच आहे, अशी ग्वाही दास यांनी दिली. एप्रिल ते डिसेंबर २०२२ यादरम्यान भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचे मूल्य २२.३ अब्ज डॉलर एवढे होते. तर त्याआधीच्या वर्षीच्या याच नऊ महिन्यांच्या कालावधीत ही गुंतवणूक २४.८ अब्ज डॉलर एवढी झाली होती. त्यातुलनेत हे प्रमाण थोडे कमी असले तरी देखील हे प्रमाण चांगले असल्याचेही ते म्हणाले.
----
परकीय कर्ज कमीच
आंतरराष्ट्रीय मानकांचा विचार करता भारताचे परकीय कर्ज कमी आहे. भारताच्या परकीय कर्जाचे देशाच्या जीडीपी बरोबर असलेले प्रमाण मार्च २०२२ मध्ये १९.९ टक्के होते. ते सप्टेंबर महिन्यात १९.२ टक्के एवढे घसरले. सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च २०२३ या वर्षात भारताचे परकीय कर्ज ४.८३ लाख कोटी रुपये एवढे राहील. भारतावरील एकूण कर्ज १५२.६१ लाखकोटी रुपये एवढे आहे. म्हणजेच देशावरील परकीय कर्ज एकूण कर्जाच्या जेमतेम ३.१६ टक्के एवढेच आहे. तर मार्च २०२४ पर्यंत परकीय कर्ज एकूण कर्जाच्या ३.०८ टक्के एवढेच राहील असाही अंदाज आहे.
------
परकीय चलनसाठा
यावर्षी २७ जानेवारी रोजी देशाचा परकीय चलन साठा ५७६.८ अब्ज डॉलर एवढा होता. त्याआधीच्या साधारण तीन महिन्यांपुर्वी म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी तो साठा ५२४.५ अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याचा होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.