ठाणे पालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारी अखेर सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारी अखेर सादर
ठाणे पालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारी अखेर सादर

ठाणे पालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारी अखेर सादर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : कोरोनाच्या काळानंतर सर्वच क्षेत्रांसह पालिकेच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यात पालिकेवर असलेल्‍या दायित्वामुळे आर्थिक परिस्थिती दोलायमान झाली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात पालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आली असून, त्यानंतर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. यंदाचा अर्थसंकल्प पालिका प्रशासनाकडून सादर करण्यात येणार असून, तो फेब्रुवारी अखेरीस सादर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून ठाणेकरांना काय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मागील वर्षी ठाणे महापालिकेचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प वास्तववादी व मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करीत तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सादर केला होता. तीन हजार २९९ कोटी रुपयांच्‍या या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नव्हती. त्यात महिनाभरातच पालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात येऊन प्रशासकीय राजवट लागू झाली. वर्षभराचा काळ लोटत आला तरी पालिका निवडणुकांचा कार्यक्रम देखील जाहीर झाला नाही.
येत्या महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेचा २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात कोरोना काळात ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर विभाग वगळता इतर विभागांच्या उत्पन्न वसुलीत मोठी घट झाली. त्यात कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी अधिक निधी खर्च करण्यात आला. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आहे. पालिकेवर सुमारे चार कोटींचे दायित्व आहे. यामु‌ळे पालिका आर्थिक संकटात सापडली असून, ही परिस्थिती आजही कायम आहे.
-------------------------------------------------
पालिकेला आर्थिक दिलासा
ठाणे पालिकेच्या विविध विभागांकडून करवसुली होत असली तरी दायित्व कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी पालिकेला दिला. त्या निधीतून सुशोभिकरण, रस्ते नूतनीकरण, तसेच विविध कामे सुरू आहेत. या निधीमुळे पालिकेला काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षी पालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असून त्यात नव्या प्रकल्पांची घोषणा होणार की जुन्याच प्रकल्पांच्या पूर्णत्वावर भर देणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.