महसुलाचा हिशेब न लागल्यास दंडाची तरतूद

महसुलाचा हिशेब न लागल्यास दंडाची तरतूद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : एसटी बसमध्ये प्रवासादरम्यान वाहकाने ‘ईटीआयएम’ मशीनमधील चुकीचे बटण दाबल्यामुळे तिकिटांच्या महसुलाच्या हिशेबाचा ताळमेळ जुळत नाही. या प्रकारावर यापूर्वी स्थानिक पातळीवर कारवाई केली जात होती. शिवाय वसुलीही केली जायची; मात्र आता एसटीच्या वाहतूक विभागाने अशा निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी २०० रुपये; तर जास्तीत जास्त १००० रुपये दंडाची तरतूद केली आहे. तशा सूचनाच राज्यातील विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.

वाहक किंवा कर्मचाऱ्यांनी ईटीआयएम मशीनमध्ये चुकीचे बटण दाबल्यास चुकीच्या नोंदी घेतल्या जातात. यामुळे दर्शविण्यात आलेल्या रकमेच्या कमतरतेमुळे तिकिटांचा हिशेब लागत नाही. अशा चुका आढळल्यास सत्यता पडताळून कोणताही गैरप्रकार घडला की नाही, याची शहानिशा करावी. दोषी आढळून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर निष्काळजीचा ठपका ठेवत कमीत कमी २००; तर जास्तीत जास्त १००० रुपये दंड करण्यात यावा, अशा सूचना एसटीचे वाहतूक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहेत.

वाहकांकडून होणाऱ्या चुका
ईटीआयएममधील सर्व तिकिटे दोनदा सेव्ह होणे, अॅडव्हान्स बुकिंग करताना पोलिस वॉरंटची नोंद होणे, वायआयएन बटण दाबून जास्त रकमेचे जादा तिकीट येणे, तिकीट ट्रेचा हिशेब तांत्रिक दोषामुळे घेता न येणे, टोल टॅक्सची पावती नोंद करताना वाढीव रक्कम दिसणे, नजरचुकीने बटण प्रेस झाल्याने ऑनलाईन एक्स्पेंडिचरमध्ये काही रक्कम वर्ग होणे, ईटीआयएम संगणकीय प्रणालीत आरएफआयडी पासचा हिशेब घेताना नजरचुकीने जादा रक्कम नोंद होणे, अशा अनेक चुका वाहकांकडून केल्या जात आहेत.

महसूल चोरीच्या घटना वाढतील?
बस फेरीमध्ये वाहकांकडून अनेक क्लृप्त्या वापरून महसूल लाटण्याचा प्रयत्न केला जातो. तिकीट न देता पैसे घेणे, शिल्लक पैसे न देणे, तिकीट देताना कोरे तिकीट देणे आदी प्रकार सर्रास घडतात. यावर चुका टाळण्यासाठी महामंडळाने किरकोळ दंडाची तरतूद केल्याने भविष्यात ‘१० हजारांचा अपहार करा आणि १००० दंड भरा’, असा पायंडासुद्धा पडण्याची शक्यता एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

मार्ग तपासणीतील कारवाई (आकडेवारी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२)
भाडेवसुली करून तिकीट न देणे - ४६६
भाडे न घेता तिकीट न देणे - १६४४
कमी भाडेवसुली २१३
जुन्या तिकिटाची पुन्हा विक्री १०
कमी रोकड मिळणे - ६१६
जादा रोकड मिळणे - ५२८
इतर प्रकरणे - ७,०६३
एकूण प्रकरणे - १०,५४०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com