
७४७ तिकीट दलालांवर पश्चिम रेल्वेची कारवाई
मुंबई, ता. ९ : लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना पकडण्याकरिता पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा दलाने एकूण ७४७ तिकीट दलालांना पकडले. गेल्या महिन्यात रेल्वे तिकिटांची अवैध विक्री करणाऱ्यांवर ४७ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या कारवाईत आरपीएफने पाच लाख ९३ हजारांची १८३ ई-तिकिटे जप्त केली आहेत.
अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशाला तिकीट उपलब्ध होत नाही. तत्काळ तिकीट मिळवण्यासाठी अनधिकृत दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना तिकिटाची विक्री करण्यासाठी दलाल तिकीटघरासमोर असतात. इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांकडून या दलालांचा आधार घेत तिकीट घेण्यात येते. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. हीच बाब निदर्शनास आल्याने आता पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पोलिसांनी तिकीट दलालांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. आरपीएफ पोलिसांनी गेल्या वर्षभरात ७४७ तिकीट दलालांना अटक केली. त्यांच्याकडून ३२ कोटी ६४ लाखांची तिकिटे जप्त केली. मुंबई, भावनगर, रतलाम आणि अहमदाबाद विभागात एका दिवसात वेगवेगळ्या सात तिकीट दलालांवर कारवाई केली. त्यात ६ लाख २४ हजार किमतीची ४५७ तिकिटे जप्त केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.