
१४ गुन्ह्यांतील आरोपीला ट्रॉम्बे पोलिसांकडून बेड्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांत १४ गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला ट्रॉम्बे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद सिद्दीक मोहम्मद फारुख शेख असे आरोपीचे नाव असून तो ट्रॉम्बे येथील नागरिक आहे. आरोपी जबरी चोरीच्या १४ गुन्हांत सहभागी असल्याची पोलिस नोंद आहे. आरोपीकडून प्राणघातक हत्यार तसेच चोरलेली मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे.
या प्रकरणी फिर्यादी साजिद अखिल अहमद आपल्या बहिणीसोबत ७ फेब्रुवारीला पायी चालत जात असताना आरोपीने फिर्यादी यांच्या पोटाला सुरा लावत धमकावून जबरीने त्यांच्या हातातील मोबाईल व खिशामधील रक्कम हिसकावून नेली. तसेच मदतीसाठी येणाऱ्या लोकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी साजिद अहमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ट्रॉम्बे पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. परिसरात सीसी टीव्ही तपासले.
आरोपीने फिर्यादीचा मोबाईल जबरीने घेऊन गेल्यानंतर मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे मानखुर्द रेल्वे नक असल्याचे तपासात समोर आले. तात्काळ गुन्हे पोलिस पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपीचा परिसरात शोध घेतला. मानखुर्द रेल्वेस्थानकाहून नवी मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर मुंबईत १४ गुन्ह्यांची नोंद आहे.