सागराला शरण आणणारी चौलची शितळादेवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सागराला शरण आणणारी चौलची शितळादेवी
सागराला शरण आणणारी चौलची शितळादेवी

सागराला शरण आणणारी चौलची शितळादेवी

sakal_logo
By

रेवदंडा, ता. १२ (बातमीदार) ः अलिबाग तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवरील रेवस ते रेवदंडा या वसलेल्या गावांना अष्टागर असे म्हटले जाते. अशा या आंग्रेकालीन अष्टागराला संस्कृती व व्यापारासाठी पुरातन काळापासून श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते. संस्कृतीस धर्माचे अधिष्ठान व व्यापारी वर्गासाठी धार्मिक प्रवृत्ती असल्याशिवाय मानवी जीवनास आत्मिक समाधान लाभत नसल्‍याचे बोलले जाते. यासाठी पुरातन काळापासून अष्टागरात मंदिरे बांधण्यात आली. चौल-रेवदंडा या जोड गावात पांडवांनी तीनशे साठ मंदिरे तितकेच तलाव बांधले, अशी आख्यायिका सांगितली जाते.
हिरव्यागर्द नारळी-पोफळीच्या छायेत चौल चौकी ते आग्राव रस्त्यावर असलेल्या शितळादेवीचे‌ मंदिर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या सागरतीरावर चंपानगरीत देवीची उपासक असलेली सुंदर, निर्मळ, उदार,धर्मशील, कोमल मनाची चंपावती राणी राज्य करीत होती. या नगराला समुद्राचा वेढा पडला होता. उधाणे‌ व लाटांमुळे तटबंदी सारखी तुटत असे व समुद्राचे पाणी आत येऊन नुकसान व्हायचे. पाण्याच्या संकटामुळे राणी हतबल होई, दु:खी होऊन दिवसरात्र चिंता करी. बरेच दिवस असेच सुरू राहिल्‍याने राणीने एकांतात अनुष्ठानास प्रारंभ केला. मौनव्रत पाळून देवीची उपासना सुरू केली. नवरात्रातील आठ दिवस गेले. राणीच्या उपासना व्रताला यश आले. शितळामाता (शितला) प्रत्यक्ष प्रकट होऊन म्हणाली की चंपावती काय संकट आले ते तू मला सांग, तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे. त्यावर राणीने उधाण व लाटांमुळे होणारा त्रास सांगितला. या नगरीचे रक्षण कर म्हणताच शितलामातेने हातातील तुंबर सागरावर फेकला व सागर अडविला. त्यानंतर सागर शांत झाला. चंपावती राणीने शितला मातेला सिंहानावर बसवले. पूजापात्र घेऊन मातेची पूजा करून निर्मळ गंगाजल, हळदी-कूंकू, आभूषणे, कनक, वस्त्र, खण-चोळी, नारळ अर्पण केला. तेव्हापासून चंपावती नगरीत देवीचे स्थान निर्माण झाले. शितलामातेचा दरबार देवदेवतांचे माहेरघर झाल्‍याची पौराणिक कथा आहे.

आंग्रे कुटुंबाचे श्रद्धास्‍थान
चौलच्या आंबेपुरी पाखाडीत शितळादेवीचे भव्य मंदिर आहे. १७८५ मध्ये एप्रिल महिन्यात राघोजी आंग्रे कुटुंब देवीच्या दर्शनास आले होते. १७९२ मध्ये मुलाबद्दलचा नवस फेडण्यासाठी आले असताना हत्ती, घोडे, सरंजाम व काही लष्करबरोबर होते व काही दिवस येथे तळ ठोकून होते. १८०५ मध्ये बाबुराव आंग्रे दर्शनाला आले होते. पुढे दरवर्षी आंग्रे कुटुंब देवीच्या दर्शनाला दसऱ्याच्या दिवशी आवर्जून येत. व देवीच्या रक्षकाचा मान देत.

अनेकांची कुलदैवता
अलिकडच्या काळात मार्च १९९७ मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. ही देवता राज्यातील व परराज्यातील अनेक कुटुंबाची कुलदेवता आहे. रविवार, मंगळवार व शुक्रवारी बारमाही दर्शनाला गर्दी असते. नवरात्रोत्‍सवही पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.