
रायगड
२३ जोडप्यांचा पुन्हा संसार जुळला
अलिबाग, ता. १२ (बातमीदार) ः दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत, या हेतूने शनिवारी रायगड जिल्ह्यात लोकन्यायालय घेण्यात आले. यामध्ये वादपूर्व व दाखल अशी एकूण ३७ हजार ७६३ प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात आली आहेत. तर २३ जोडप्यांचे दुभंगलेली मने पुन्हा जुळली. जिल्हा न्यायाधीश एस. एस. सावंत व पॅनलवरील न्यायधिशांनी पुष्पगुच्छ देवून या जोडण्यांचा सत्कार करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील वादपूर्व प्रकरणे व प्रलंबित अशी एकूण ९८ हजार ६२३ प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी वादपूर्व प्रकरणे ३६ हजार २२५ व प्रलंबित प्रकरणांपैकी एक हजार ५३८ प्रकरणे अशी एकूण ३७ हजार ७६३ प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली काढली. त्याद्वारे पक्षकारांना एकूण १३ कोटी २९ लाख आठ हजार ५२६ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. तसेच
जिल्ह्यातील अलिबाग येथील लोकन्यायालयात सात, कर्जतमध्ये एक, माणगाव दोन, पाली एक, रोह्यात पाच ,महाडमध्ये सहा, पनवेलमध्ये एक अशी २३ प्रकरणांचा सामंजस्याने वाद मिटल्यामुळे पुन्हा नव्याने जोडपे नांदायला गेली.
------------------
‘पंचायत समिती जिंकण्यासाठी सज्ज व्हा’
पेण, ता. १२ (वार्ताहर) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या समाजोपयोगी कामांच्या निर्णयांमुळे विकासाची घोडदौड सुरू आहे. पेण तालुक्यातही रस्ते, पेयजल योजना अशा विकासकामे सुरू आहेत. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहून भाजपची सत्ता आणावी, असे आवाहन आमदार रवी पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. पेण तालुक्यातील वाशी, ओढांगी, वढाव, मोठे वढाव, तामसी बंदर, घोडा बंदर, मळेघर वाडी, जनवली आदी ठिकाणी रस्त्याची कामे, अंगणवाडी इमारत बांधणे, प्राथमिक शाळा दुरुस्ती, व्यायाम शाळा इमारत बांधणे, गटारे बांधणे, साकव बांधणे, समाज मंदीर बांधणे यासह इतरही समाजोपयोगी विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
जल जीवन मिशनअंतर्गत ‘हर घर नल से जल’ योजनेतून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाणार असून खारेपाटातील पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, सरपंच पूजा पाटील, अशोक पाटील, परशुराम पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------
‘आम्ही पेणकर विकास आघाडी’ निवडणूक लढणार
पेण, ता. १२ (वार्ताहर) : पेण नगरपालिकेची निवडणूक ‘आम्ही पेणकर विकास आघाडी’च्या माध्यमातून लढणार असल्याची माहिती आघाडीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, माजी मंत्री आप्पासाहेब धारकर हे काँग्रेस पक्षाचे कॅबिनेट मंत्री असताना त्यांनी शहरात कधीही पक्षिय राजकारण केले नाही. उलट निवडणुका दरम्यान सर्व पेणकरांना एकत्रित करीत आघाडीच्या वतीने निवडणुका लढवल्या आहेत. तोच आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून शहरात पक्षविरहित आणि सर्वांनासोबत घेऊन शहराच्या विकासाकरिता लढणार आहोत.
शहरात नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा, अरुंद रस्ते, अरुंद गटारे, रखडलेले भाजी मार्केट, मच्छी मार्केट, अस्वच्छता, घनकचरा विल्हेवाटीचा प्रश्न, रखडलेले नाट्यगृह आदी समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे ‘आम्ही पेणकर विकास आघाडी’ सर्व पेणकरांना बरोबर घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे शिशिर धारकर यांनी सांगितले.
--------------------
कोलाड १०५ रुग्णांची नेत्र तपासणी
रोहा, ता. १३ (बातमीदार) ः महादेवाडीत (बाईतवाडी) आयोजित नेत्रचिकित्सा शिबिरात १०५ जणांची तपासणी करण्यात आली तर १३ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ कोलाड, रोहा लायन हेल्थ फाऊंडेशन, समता फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात डॉ. सागर सानप, मार्गदर्शक रवींद्र घरत, नरेश बिरगावले, डॉ. विनोद गांधी, रवींद्र लोखंडे, खजिनदार डॉ. श्याम लोखंडे, नंदकुमार कलमकर, राजेंदर कोप्पू आदी उपस्थित होते. कोलाड परिसर मोतीबिंदू मुक्त करण्याचा मानस असल्याचे विचार लायन्स क्लबचे उपाध्यक्ष नरेश बिरगावले यांनी व्यक्त केले.
--------------------
महाराष्ट्र केशरी शिवराज राक्षेची मॅरेथॉनला उपस्थिती
माणगाव (वार्ताहर) ः टीडब्लूजे (ट्रेड विथ जाझ) आणि सह्याद्री स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार सह्याद्री मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला जिल्ह्यातून स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची उपस्थिती स्पर्धकांचे खास आकर्षण ठरले. १४ वर्षापर्यंत मुलामुलींना ३ किमी, १७ वर्षापर्यंत मुलामुलींना ५ किमी, महिला व पुरुष खुला गट १० किमी, आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तीस ड्रीम रन २ किलोमीटर अशी विभागणी करण्यात आली होती. विविध गटात पहिल्या सहा येणाऱ्या विजेत्यांना रोख बक्षिसांसह सन्मानपदक व प्रमाणपत्र देण्यात आली. तसेच प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि टी शर्ट देण्यात आले.
......................
धनवीतील महिलांची वणवण थांबली
जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून विहिरीचे काम
माणगाव, ता. १३ (वार्ताहर) ः तालुक्यातील दुर्गम भागातील पळसगाव खुर्द धनवी ग्रामस्थांना अनेक वर्षे पाणी समस्या भेडसावत आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्याचा पाठपुरावा करीत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या शेष फंडातून धनवी येथे विहीर मंजूर करण्यात आली. विहिरीचे बांधकाम पूर्ण झाले असून नुकतेच निजामपूर विभाग राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पळसगाव खुर्द धनवी येथील दुर्गम भाग असलेल्या धनगर वस्तीला अनेक वर्षे पाणी प्रश्न भेडसावत होता. महिलांना पिण्याचे पाण्यासाठी मैलोन मैलाची वणवण करावी लागायची. शिवाय गाई-गुरांच्या पिण्याच्या पाण्याचीही समस्या होती. गावाचा पाणीप्रश्न सुटावा यासाठी स्थानिक ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश ढवळे यांनी माणगाव- महाड-पोलादपूर विधानसभाचे अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केला. खासदार सुनील तटकरे यांच्याकडे खानविलकर यांनी पाणीसमस्या मांडली असता, त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून निधी मंजूर करून गावात पिण्याच्या पाण्यासाठी विहीर बांधली. उद्घाटन सोहळ्यासाठी निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासोबत निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव किरण पागार, ग्रुप ग्रामपंचायत गांगवलीच्या सरपंच नेहा दाखिणकर, मंगेश कांबळे, मंगेश कांबळे, साधू सुतार आदी उपस्थित होते.
माणगाव ः पळसगाव खुर्द धनवीत विहिरीचे काम करण्यात आले.
----------------------------------------
वक्तृत्व स्पर्धेत तनुजा जाधव प्रथम
पोलादपूर (बातमीदार) ः शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचालित सुंदरराव मोरे महाविद्यालयात रामचंद्र धोंडदेव चित्रे स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे नुकतेच आयोजन केले होते. सहयोग प्रतिष्ठानच्या सहकाऱ्याने झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन प्रतिष्ठानचे कार्यवाह दत्तात्रेय काठाळे व माजी केंद्रप्रमुख सुरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या २३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात महाड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थिनी तनुजा तानाजी जाधव हिने प्रथम तर याच महाविद्यालयाच्या मयुरी प्रकाश कदम हिने द्वितीय क्रमांक पटकावला. पोलादपूरच्या विद्या मंदिरातील प्रथमेश पांडुरंग मोरे या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांकासह सन्मानचिन्हे प्राप्त केली. स्पर्धेतील विजेते व सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे व रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
..............