
वसईत भंडारी खाद्य मेळावा
विरार, ता. १४ (बातमीदार) : तिरपण, भंडारी वडे, गावठी कोंबड्याचे मटण, वजरी, खिमा वडे, भंडारी तांबडे चिकन यांच्या बरोबरच विविध प्रकारच्या शाकाहारी पदार्थांचा समावेश असलेल्या भंडारी खाद्य पदार्थांवर वसईकरांनी ताव मारून आनंद लुटला. वसईत भंडारी खाद्य मेळाव्याचे आयोजन भंडारी समाजातर्फे करण्यात आले होते. या वेळी शाकाहारी, मांसाहारी खाद्य पदार्थांसह अस्सल भंडारी पद्धतीच्या पारंपरिक पदार्थ यांचा आनंद वसईकरांनी लुटला.
शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळ, वसई यांच्यातर्फे वसईत भंडारी खाद्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन माजी महापौर प्रवीण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पल्लवी पाटील, वैष्णवी राऊत, वंदना राऊत, चित्रा ठाकूर, डॉ. भक्ती पाटील, भारती ठाकूर, वंदना राऊत, मंडळाचे अध्यक्ष राजेश राऊत, सचिव जयप्रकाश ठाकूर, ओमकार म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.