विरारच्या स्विमिंग पुलासाठी मुहूर्त मिळेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरारच्या स्विमिंग पुलासाठी मुहूर्त मिळेना
विरारच्या स्विमिंग पुलासाठी मुहूर्त मिळेना

विरारच्या स्विमिंग पुलासाठी मुहूर्त मिळेना

sakal_logo
By

विरार, ता. १६ (बातमीदार) : कोरोनाच्या काळात २०२० पासून विरार येथील पापडखिंड येथील स्वीमिंग पूल सरकारच्या निर्देशाप्रमाणे बंद केला गेला. पूल बंद करून प्रशासनाने या तरण तलावातील सर्व पाणी बाहेर काढून तलाव रिकामा केला. पण पाणी काढल्याने त्यातील टाईल्सना उन्हामुळे तडा गेल्याने तलावातून पाण्याची गळती होऊ लागली. परिणामी पुल हा वापरात नसल्याने इतर यंत्रणाही नादुरुस्त झाल्या आहेत. यामुळे तलावाच्या दुरुस्तीचे आदेश व निविदा प्रक्रिया करण्यात आली. याला एक वर्ष कालावधी लागला. दुरुस्तीच्या कामासाठी ३० लाखांहून अधिक खर्च झाला आहे. आता पूल तयार झाला असला, तरी त्याला उद्‌घाटनाचा मुहूर्त मिळत नसल्याने खेळाडूंचे मात्र हाल होत आहेत.
वसई विरार महापालिकेचा एकमेव असा ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव विरार येथील पापडखिंड येथे आहे; परंतु कोरोना काळात हा पूल बंद झाल्याने, नंतर तो दुरुस्त झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून तो बंद आहे. त्यानंतर या स्वीमिंग पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले असले, तरी या पुलाच्या उद्‌घाटनाची मुहूर्त मात्र पालिका प्रशासनाला मिळालेला नाही. ऑलिम्पिक दर्जाचा हा एकच तरणतलाव महापालिका हद्दीत असल्याने अनेक जलतरणपटूंना सरावासाठी त्याचा आधार होता; मात्र मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने त्यांचे हाल होत आहेत. तसेच अनेकांनी तरणतलावासाठी आगाऊ स्वरूपात वार्षिक फी भरली होती; पण कोविड काळात त्यांना तरणतलावाचा वापर करता आला नाही. त्यामुळे महापालिकेने काही सवलत द्यावी, अशी मागणी जलतरणपटूंकडून केली जात आहे.
====
विरार येथील ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल लवकरात लवकर सुरू केल्यास आम्हा खेळाडूंना त्याचा फायदा होणार आहे. आम्हाला सध्या सरावासाठी मुंबईला जावे लागत आहे.
- अमोघ कुरकरे, जलतरणपटू
==
जलतरण तलावाचे काम पूर्ण होत आले असून, थोडेसे काम बाकी असून ते लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर हा पूल सुरू करण्यात येणार आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त
======
जलतरण तलावाबाबत काही सूचना केल्या आहेत. तसेच तलाव अद्ययावत करण्यात यावा, याबाबत आयुक्तांशी चर्चा केली आहे. आयुक्तांनी हा पूल लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
- अजीव पाटील, अध्यक्ष, पालघर जिल्हा स्वीमिंग असोसिएशन