
शेअरबाजार सेन्सेक्स २५० अंश घसरला
मुंबई, ता. १३ : धास्तावलेल्या जागतिक शेअर बाजारांमुळे आज भारतीय शेअर बाजारांनीही त्यांचाच कित्ता गिरवताना सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदवली. आज भारतीय शेअरबाजार निर्देशांक साधारण अर्धा टक्का घसरले. सेन्सेक्स २५०.८६ अंश, तर निफ्टी ८५.६० अंशांनी घसरला.
आज प्रतिकूल जागतिक परिस्थितीमुळे व्यवहार सुरू होताना सेन्सेक्स व निफ्टी थंड होते. मात्र नंतर लगेच त्यांच्यात घसरण सुरू झाली, शेवटच्या तासाभरात पडलेल्या भावात खरेदी झाल्याने बाजार कसे तरी सावरले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ६०,४३१.८४ अंशांवर, तर निफ्टी १७,७७०.९० अंशांवर स्थिरावला.
आज दिवसभर सेन्सेक्स साठ हजारांच्या खालीही गेला नाही आणि त्याने एकसष्ठ हजारालाही स्पर्श केला नाही. आज आयटी, धातूनिर्मिती कंपन्या व सरकारी बँका ही क्षेत्रे सर्वात जास्त म्हणजे एक ते दोन टक्के घसरली. अदाणी समूहासंदर्भातील प्रतिकूल बातम्यांमुळे त्यांची घसरण आजही सुरू राहिली. अदाणी एंटरप्राईजेस आठ टक्के, तर अदाणी पोर्ट पाच टक्के घसरला. त्याखेरीस निफ्टीवरील स्टेट बँक तीन टक्के, इन्फोसिस अडीच टक्के, तर टीसीएस, टेक महिंद्र, विप्रो हे आयटीचे शेअर एक टक्का घसरले. निफ्टीमधील टायटन, एल अँड टी, बजाज ऑटो, आयशर मोटर्स या शेअरच्या किमतीत एक ते दोन टक्का वाढ झाली. आज निफ्टीच्या मुख्य ५० पैकी ३४ शेअरचे भाव घसरले, तर सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी १८ शेअरचे भाव घसरले.
कोट
.............
बाँडचा परतावा, तसेच डॉलर इंडेक्स वाढत असल्यामुळे आयटी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअरची आज जोरदार विक्री झाली. अदाणी समूहाच्या शेअरमध्ये पडझड सुरूच असल्याने बाजारात आणखी निराशा झाली. अमेरिकेत चलनवाढ कमी होण्याची शक्यता असल्यामुळे व्याज दरवाढ होण्याच्या चिंतेमुळे सर्वत्र निराशा होती.
- विनोद नायर, जिओजित फायनान्स