
रायगड बातम्या
रेवदंड्यात आरोग्य तपासणी
रेवदंडा (बातमीदार) : प्रत्येक व्यक्तीने वयाप्रमाणे योग्य आहार, आवड असलेल्या छंदात गुंतून घेणे, व्यायाम करणे, व्यसनापासून दूर राहिल्यास आरोग्य सुदृढ राहते, असे मार्गदर्शन डॉ. आयेशा किरकिरे यांनी केले. अलिबाग तालुक्यातील चौल-दादरमधील अल-सेहा क्लिनिकमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरात तपासणीप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. किरकिरे बोलत होत्या. रक्तातील साखर, रक्तदाब, ऑक्सिजन, पल्स रेट यांची मोफत तपासणी करण्यात आली. सुमारे ३० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला.
रेवदंडा : नागरिकांची आरोग्य तपासणी करताना डॉक्टर.
संजय कदम यांची रोहा कार्यालयाला भेट
रोहा, ता. १३ (बातमीदार) : उद्धव गटाचे दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांनी शनिवारी (ता. ११) सकाळी ११ वाजता रोहा शहर शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट दिली. तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी त्यांचे स्वागत केले. शिवसेनेत फूट पडली आहे; मात्र याचा काडीमात्र रोहा शहर आणि तालुका शिवसेनेला फटका बसलेला नाही. शिवसैनिक आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. शिवसेनेला अधिक प्रमाणात बळकटी देण्यासाठी सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात, अशी माहिती तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदनिशी उतरणार आहे. यात १०० टक्के यश मिळणार, असा विश्वास संजय कदम यांनी व्यक्त केला. या वेळी महिला तालुका आघाडी प्रमुख नेहा हजारे, शहरप्रमुख दीपक तेंडुलकर, समीक्षा बामणे, महादेव साळवी, हर्षद साळवी, प्रीतम देशमुख, बिलाल मोरबेकर, यतीन धुमाळ आदी शिवसैनिक उपस्थित होते.
रोहा : ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम यांनी रोहा शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट दिली.
सुरेश शिर्के यांचा सेवानिवृत्ती प्रित्यर्थ सन्मान
रोहा (बातमीदार) : रोहा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष सुरेश शिर्के यांचा सेवानिवृत्ती प्रित्यर्थ विशेष सन्मानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात आला. तालुका ग्रामपंचायत कर्मचारी, संघटना यांच्या वतीने महांळुगे येथील संघटनेचे विजय कांडणेकर यांच्या निवासस्थानी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी तालुका गट विस्ताराधिकारी शुभदा पाटील, विस्ताराधिकारी सुनील गायकवाड, सरपंच नारायण गायकर, संकेत जोशी, मंगेश म्हात्रे, गोविंद म्हात्रे, दर्शना कांडणेकर, रेश्मा रायकर, मंजुळा नागोठकर, वाफिलकर, राजेंद्र पाटील, ठाकूर ग्रामसेवक, जयेंद्र डोलकर, प्रशांत चोरगे, शत्रुघ्न कामथेकर उपस्थित होते. या वेळी संघटनेच्या वतीने त्यांचा सपत्निक यथोचित सन्मान करण्यात आला. यानिमित्त हळदी-कुंकू समारंभही घेण्यात आला.
नार्वेच्या पाहुण्यांची गॅलेक्सी हॉस्पिटलला भेट
पेण (बातमीदार) : चिल्ड्रन फ्युचर इंडियाच्या मदतीने शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. आम्ही फ्युचर इंडियाला दिलेला निधी सार्थकी लागल्याचे समाधान मिळत आहे. गॅलेक्सी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर त्यांनी केलेल्या स्वागताला ते भारावून गेल्याचे उद्गार नार्वेच्या हेगे मॅग्नीसिस यांनी काढले. हेग मॅगनीसिस चिल्ड्रन फ्युचर इंडिया या संस्थेत आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी गॅलेक्सी हॉस्पिटलला भेट दिली. डॉ. रत्नदीप गवळी, राजेश टेलर, डॉ. समीर पटेल, डॉ. नैना जवाहर मुलानी, डॉ. नयन ब्रह्मे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. सुमन म्हात्रे, डॉ. सिद्धांत पाटील, डॉ. प्रतीक्षा शहासने, डॉ. सोहन यांच्यासह कर्मचार्यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. पेणमध्ये सर्व सोई-सुविधांयुक्त आरोग्य सेवा उत्तम कमी दरात दिली जात असून, मुंबई, पुणे, पनवेल व इतर ठिकाणी उपचाराला नेण्यासाठी जाणारा वेळ वाचून चांगला उपचार मिळत असल्याची भावना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाकडून वारंवार व्यक्त होत असल्याचे डॉ. रत्नदीप यांनी सांगितले.
नांदाडी शाळेत शौचालयाचे बांधकाम
पेण (बातमीदार) : चिल्ड्रन फ्युचर इंडिया या संस्थेच्या मदतीने पेण तालुक्यातील नांदाडी शाळेतील शौचालयाच्या बांधकामाचे उद्घाटन नार्वे येथील आयबीएनच्या चेअरपर्सन हेगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी चिल्ड्रन फ्युचर इंडियाच्या प्रोग्राम मॅनेजर अक्षता सावंत शाळेचे शिक्षक नितीन पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. नांदाडी शाळेतील असलेले शौचालय मोडल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन चिल्ड्रन फ्युचर इंडियाने या शाळेत शौचालय बांधून दिले. याप्रसंगी ग्रामस्थ मंडळींनी संस्थेचे आभार मानले.
नादुरुस्त रोहित्रामुळे वारंवार वीज खंडित
रेवदंडा, ता. १३ (बातमीदार) : येथील मच्छीमार्केट परिसरात असलेल्या विद्युत रोहित्रावरील कटआऊट अनेक महिन्यांपासून नादुरुस्त झाला आहे. यामुळे अनेक ग्राहकांना वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. कटआऊटची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी अलिबाग येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे. या कटआऊटमुळे अपघाताचा धोका आहे. विद्युत रोहित्र यंत्र वर्दळीच्या ठिकाणी असून समोरूनच अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्ता आहे. दुतर्फा लोकवस्ती असल्याने दुरुस्ती गरजेची आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे स्थानिक अभियंता जयेंद्र सपत्काळ यांनी सांगितले की, नागरिकांचे निवेदन प्राप्त झाले आहे. ते काम काही दिवसांत होईल. त्यासाठी काही अडचणी असून याबाबत अर्जदारांना कल्पना दिली आहे.
बातमीला फोटो पाठवला आहे.