
चालक परवान्यासाठी ऑनलाईन तारीख मिळेना
मुंबई, ता. १४ : मुंबई सेंट्रल येथील मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांतर्गत ट्रान्स्पोर्ट आणि अवजड वाहनचालक परवाना ऑनलाईन यंत्रणेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही यंत्रणा काही ठराविक वेळेसाठीच खुली करून पुन्हा बंद केली जात असल्याने चालकांना आपला परवाना काढून घेण्यासाठी तारीखच मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. परिणामी वाहनचालक परवाना काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेकदा आल्या पावली परत जावे लागते आहे. गेल्या चार महिन्यांपासून हीच परिस्थिती असल्याने व्यावसायिकदृष्ट्या चालक परवाना काढणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नुकतेच परिवहन विभागाने आरटीओतील परवाना संबंधित सेवा ऑनलाईन केल्या आहेत. ज्यामध्ये आता पक्का चालक परवाना काढण्यासाठीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने वेळ घेऊन चाचणीसाठी हजर राहायचे असते. मात्र, ऑनलाईन वेळ घेण्याची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अवघ्या काही काळासाठी ऑनलाईन यंत्रणा उघडी होऊन पुन्हा बंद होत असल्याने चालकांना चाचणीसाठी तारीख घेणेही कठीण झाले आहे. परिणामी ट्रान्स्पोर्ट आणि अवजड वाहनाच्या परवाना चाचणीपासून नागरिकांना वंचित राहावे लागत आहे; तर अनेकांचा तात्पुरता परवाना कालबाह्य होण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.
एलएमव्ही (लाईट मोटर व्हेइकल) ट्रान्स्पोर्टच्या पक्क्या परवान्यासाठी २० डिसेंबरपासून प्रयत्न करत आहे; पण रोज सकाळी १० वाजता फक्त १ मिनिटासाठी ऑनलाईन यंत्रणा सुरू होते व लगेच बंद होते. आरटीओने तारीख घेण्याची ऑनलाईन यंत्रणा दिवसभर सुरू ठेवावी किंवा वेळ तरी वाढवून द्यावी. परवाना नसल्यामुळे मला काम मिळत नाही. त्यायामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
– यश मोरे, रहिवासी, वरळी
ट्रान्स्पोर्ट ड्रायव्हिंग स्कूल आणि त्यांच्याकडे असलेल्या वाहनांच्या संख्येप्रमाणे आपण स्लॉट ठेवले आहेत. त्याबाबत कोणत्याही तक्रारी नाहीत. काही तांत्रिक अडचणी असल्यास त्याची माहिती घेण्यात येईल.
- भरत कळसकर, आरटीओ, मुंबई सेंट्रल