
ऑनलाईन कर्जाच्या प्रलोभनातून गंडा
नवी मुंबई (वार्ताहर) : मुलाच्या शिक्षणासाठी ४० लाखांचे कर्ज मिळवून देण्याच्या प्रलोभनातून एका महिलेला ७ लाख ८८ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
उलवे भागात राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेचा मुलगा मर्चंट नेव्हीची परीक्षा देणार होता. त्यामुळे त्याच्या शिक्षणासाठी १५ लाखांची आवश्यकता होती. त्यामुळे या महिलेने गुगलवर ऑनलाईन वैयक्तिक लोन मिळण्यासंदर्भात माहिती घेण्यास सुरुवात केली होती. त्याच वेळी लोन मिळेल, अशा प्रकारचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला होता. या नंबरवर महिलेने संपर्क साधला असता, रवी कुमार नाडार असे नाव सांगणाऱ्या एका सायबर चोराने प्रायव्हेट फायनान्सचे लोन मिळवून देण्याचे सांगत व्हॉट्सअॅपवर सर्व कागदपत्रे मागवली होती. तसेच लोनसाठी लागणारी प्रोसेसिंग फी, अकाऊंटटला देण्यासाठी, अॅडव्हॉन्स ईएमआयसाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून जवळपास ७ लाख ८८ हजार रुपये उकळले होते. मात्र त्यानंतर लोन मिळाले नसल्याने फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर एनआरआय पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.