भिवंडीत आरोग्य यंत्रणेला प्रसूतीकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत आरोग्य यंत्रणेला प्रसूतीकळा
भिवंडीत आरोग्य यंत्रणेला प्रसूतीकळा

भिवंडीत आरोग्य यंत्रणेला प्रसूतीकळा

sakal_logo
By

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेच्‍या शासकीय नोंदीतील लोकसंख्या सात लाखांपेक्षा जास्त असली, तरी या शहरात सुमारे १५ लाखांपेक्षा जास्त लोक राहत आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनाने महापालिकेच्या गेल्या वीस वर्षांच्या काळात शहरातील आरोग्याकडे दुर्लक्ष केले आहे. हजारो कोटींचे बजेट असलेल्या पालिकेने अद्याप नियमानुसार स्वतःचा दवाखाना आणि प्रसूतिगृह न बनविता शहरातील आरोग्य व्यवस्था इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या भरवशावर सोडून नागरिकांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. शहरातील गर्भवतींसाठी त्यांच्या प्रभागाच्या क्षेत्रात प्रसूतीची सोय न केल्याने त्यांची हेळसांड होऊन मागील आठवड्यात इंदिरा गांधी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ चिंताजनक प्रकार घडला होता.
भिवंडी शहरात प्रत्येक महिन्याला सुमारे १२०० ते १५०० च्या दरम्यान मुले जन्माला येतात. त्यापैकी ३०० ते ४०० मुले खासगी दवाखान्यात, ४०० ते ५०० इंदिरा गांधी रुग्णालयात; तर ४०० ते ५०० मुले घरगुती प्रसूतीमधून जन्माला येतात. हे प्रमाण कमी जास्त असले, तरी शहरातील गरज ओळखून महापालिका प्रशासन आणि पालिकेतील नगरसेवकांनी गेल्या वीस वर्षांत दवाखान्यासह प्रसूतिगृहे स्थापन करण्‍यासाठी पुढाकारच घेतला नाही. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना महापालिकेचा हक्‍काचा दवाखाना नसल्याने स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागत आहे.
---------------------------------------------------------------
घरगुती प्रसूतींवरच अधिक भर...
महापालिका क्षेत्रात जन्मलेल्या मुला-मुलींची नोंद महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात केली जाते. मात्र, अनेक वेळा ही नोंद वेळीच होऊन ते जन्म दाखला घेत नसल्याने जन्मलेल्या मुलांच्या आकड्यात मोठी तफावत आढळते.

जन्म-मृत्यू नोंदणी विभागाच्या प्रमुख डॉ. आरती दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२२ या महिन्यात प्रभाग समिती-१ मध्ये ३१ बालके, प्रभाग-२ मध्ये ३२ बालके, प्रभाग- ३ मध्ये ५९ बालके, प्रभाग- ४ मध्ये ३८ बालके व प्रभाग- ५ मध्ये ८२ अशी २३२ बालकांची नोंद झाली असून ही बालके घरगुती प्रसूतीमधून जन्मलेली आहेत.

डिसेंबर महिन्‍यामध्ये भिवंडीत जन्मलेल्या बालकांची संख्या एकूण ५८० आहे; तर इंदिरा गांधी रुग्णालयात जन्मलेल्या मुलाची नोंद राज्य आरोग्य प्रशासनाकडे होत असल्याने त्याची माहिती गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे उपलब्ध होत नाही.

-----------------------------------------
बोगस डॉक्‍टरांचे बस्‍तान वाढले
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बेशिस्त कारभारामुळे शहरातील बोगस डॉक्टरांवर नियंत्रण नाही. त्यामुळे एका बोगस डॉक्टराने केलेल्या प्रसूतीच्या वेळी गर्भवतीचा मृत्यू झाल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. यामधून तरी बोध घेऊन ही मोहीम पालिकेच्या डॉक्टरांनी प्रभावी केलेली नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागातील बालरोगतज्ज्ञ सध्या कोठे बसतात, याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागात मिळत नाही. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचाही तपशील मिळत नाही. या वस्तुस्थितीची दखल घेऊन पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विजयकुमार म्हसाळ यांनी चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
-----------------------------
प्रभागनिहाय यंत्रणा गरजेची
भिवंडी महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेने आरोग्य केंद्र बनविली असली, तरी अद्ययावत सुविधा असलेला दवाखाना आणि प्रसूतिगृह प्रत्येक प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रात असणे जरुरीचे आहे. आरोग्य केंद्रेदेखील त्या-त्‍या भागात बनविले, तरच त्यामध्ये परिसरातील नागरिक जाऊन उपचार करू शकतात. सध्या स्व. मीनाताई रंगायतनमध्ये इदगारोड आरोग्य केंद्र तर पद्मानगरमध्ये कणेरीचे आरोग्य केंद्र, इंदिरा गांधी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ नदीनाकाचे आरोग्य केंद्र सुरू आहे.
-------------------------------------------------------
भिवंडी महापालिकेची शहरात १५ आरोग्य केंद्रे आहेत. त्याचबरोबर पालिकेच्या पाच प्रभागात अद्ययावत प्रसूतिगृहासह दवाखाना सुरू होणार आहे. शहरात प्रभूआळी येथे महापालिकेच्‍या बीजीपी दवाखान्याचे कामही सुरू आहे.
- डॉ. बुशरा सय्यद, मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी, भिवंडी महापालिका