
राज्य महिला आयोगाचे ठाणे पोलिस आयुक्तांना पत्र
ठाणे, ता. १४ (वार्ताहर) : पिटा आणि पॉस्कोसारख्या गंभीर गुन्ह्याचे आरोपी हे कळवा पोलिस ठाण्याच्या इमारतीत फिरत असताना कुठलीच कारवाई होत नाही, यासंदर्भात आरोपीच्या कळवा पोलिस ठाण्याच्या आवारातील भ्रमंतीवर केलेल्या ट्विटची दखल राज्य महिला आयोगाने घेतली. आयोगाने आरोपीवर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलिस आयुक्तांना १३ फेब्रुवारी रोजी लेखी पत्र लिहिले. या पत्रात राज्य महिला आयोगाने सदर पिटा आणि पोक्सोसारख्या गुन्ह्यातील आरोपीवर कारवाई करीत त्याचा अहवाल आयोगाच्या संकेतस्थळावर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंब्रा पोलिस ठाण्यात एका राजकीय पदाधिकाऱ्याविरुद्ध पिटाअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतरदेखील अद्याप त्याला अटक किंवा कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र या गुन्ह्यातील आरोपी कळवा पोलिस ठाण्याच्या इमारतीत वावर करीत असताना दिसत आहे. याबाबत कुठलीच कारवाई होत नसल्याचे ट्विट प्रसारमाध्यमावर झाल्यानंतर राज्य महिला आयोगाने या संदर्भात थेट ठाणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहून कारवाईचे आणि त्याचा अहवाल आयोगाला पाठवण्यास सांगितले आहे. पिटा आणि पॉस्कोसारख्या गुन्ह्यात महिलांची तक्रार दाखल करून त्यावर कारवाईबाबत लक्ष केंद्रित करने राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.