रस्त्यांवर लखलखाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यांवर लखलखाट
रस्त्यांवर लखलखाट

रस्त्यांवर लखलखाट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ ः नवी मुंबई शहरात सिडको काळातील जुने आणि जीर्ण झालेले दिवाबत्तीचे तब्बल १३ हजार लोखंडी खांब बदलण्यात आले आहेत. जुने खांब काढून त्या जागेवर किमान २५ वर्षे चालणारे जीआयचे खांब बसवण्यात आले आहेत. नव्या बसवलेल्या या खाबांमुळे दिवाबत्तीची व्यवस्था अधिक सक्षम होणार असून त्यामुळे नवी मुंबईतील रस्त्यांना नवी झळाळी येणार आहे.
सन १९७० मध्ये सिडकोने विकसित केलेल्या नवी मुंबई शहरातील विविध नोडमधील दिवाबत्तीची व्यवस्था १९९८ पासून टप्प्याटप्प्याने नवी मुंबई पालिकेकडे सिडकोमार्फत हस्तांतर झाली आहे; तर २००५ मध्ये एमआयडीसीमार्फत औद्योगिक क्षेत्रातील दिवाबत्ती व्यवस्था महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आली होती. त्यामुळे हस्तांतरित झालेल्या दिवाबत्तीचे विद्युत खांबांचे मात्र आयुर्मान सीपीडब्ल्यूडीच्या निकषानुसार संपले असल्याने अनेकदा अपघाताच्या घटनादेखील घडल्या आहेत. आत्तापर्यंत शहरात २८ ठिकाणी विद्युत खांब पडल्याची नोंद आहे; तर या दुर्घटनेत ५ व्यक्ती गंभीर जखमी, तर अनेक वाहनांचे नुकसान झाले असल्याने गंजलेले लोखंडी विद्युत खांब बदलण्यासाठी पालिका प्रशासनानाचे पुढाकार घेतला आहे.
---------------------------
आयुर्मान साधारण २५ वर्षे
या प्रस्तावानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असलेल्या ३१ हजार विद्युत खांबांपैकी ५ हजार विद्युत खांब वेळोवेळी विविध कारणांसाठी बदलण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित १७ हजार खराब झालेले विद्युत खांब बदलण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला. या प्रस्तावानुसार नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व विद्युत खाबांचे त्रयस्थ पक्षामार्फत पर्यवेक्षण करण्यात आले. तसेच १७ हजारांपैकी साधारणत: १३ हजार खराब झालेले लोखंडी विद्युत खांब बदलण्यात आले आहेत. त्याठिकाणी जास्त आयुर्मान असलेले जीआयचे अष्टकोनी विद्युत खांब लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे सीपीडब्ल्यूडीच्या निकषाप्रमाणे त्यांचे आयुर्मान साधारणत: २५ वर्षे झाले आहे.
---------------------------
खड्डाविरहीत खांबांची रचना
सिडको व एमआयडीसीमार्फत बसवण्यात आलेले लोखंडाचे विद्युत खांब हे जमिनीत खड्डा खोदून बसवण्यात आले आहेत. ते खराब होण्याचे प्रमाण अधिक होते. नवी मुंबई महापालिकेने नवीन जीआयचे विद्युत खांब बसवताना याची विशेष काळजी घेत, सिमेंट काँक्रीटचा चौकोनी पाया बनवून त्यावर मेटल स्क्रूने हे नवीन खांब बसवलेले आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी वारंवार रस्त्यांचे खोदकाम करण्याची वेळ येणार नाही. तसेच केबलचे आयुर्मानही साधारणत: २० वर्षे असल्यामुळे यंत्रणा अधिक सक्षम झाली आहे.
---------------------------
दोन खांबांमधील अंतर कमी
काही ठिकाणी रस्त्यांवर असलेल्या जुन्या विद्युत खाबांमधील अंतर बरेच जास्त असल्याने तसेच काही ठिकाणी खांबांशेजारी असलेल्या झाडांच्या फांद्यामुळे अंधार पडत असल्याने वाहतुकीच्या विविध अडचणी निर्माण होत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी रस्त्यांवर पुरेशा क्षमतेने प्रकाश उपलब्ध होण्यासाठी दोन विद्युत खाबांमधील अंतर कमी करण्यात आले आहे.