
स्वामी विवेकानंद शाळेत सदिच्छा समारंभ
डोंबिवली, ता. १५ (बातमीदार) : राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या डोंबिवली पूर्वेतील दत्तनगरमधील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या उपक्रमशील शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ पार पडला. शुभेच्छा दिनाच्या सोहळ्याला विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. सरोज कुलकर्णी, ठाणे शहर शेतकरी कुणबी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण घरत, संस्थेचे माजी अध्यक्ष कर्डेकर, सदस्या जोशी व कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुलभा बोंडे, पर्यवेक्षिका दौंड आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी दहावीमध्ये शिकणाऱ्या ऊर्मी गोडबोले या विद्यार्थिनीने वर्गातील आपल्या मित्र-मैत्रिणींची शाळेतील अनुभवाबद्दल, परीक्षेच्या अभ्यासाबद्दल भविष्यातील वाटचालीविषयी अनेक प्रश्न विचारून त्यांची प्रकट मुलाखत घेतली. या कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी आपल्या बचतीमधून जमा केलेला मदतनिधी शाळेला भेट दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मुणगेकर यांनी केले.