
वसई विरारमध्ये पुन्हा पाणी संकट
संदीप पंडित, विरार
वसई-विरारमधील पाणी पुन्हा एकदा पेटू लागला आहे. तशी पाण्याची समस्या फार पूर्वीपासून आहे. पूर्वी विरोधक पाण्यासाठी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असत. परंतु गेल्या अडीच वर्षांपासून पालिकेवर प्रशासक राज असल्याने यावेळी चक्क सत्ताधारी बहुजन विकास आघाडीनेच पालिका प्रशासनाला रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने खऱ्या अर्थाने पाण्याची झळ जाणवू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.
वसई-विरार महानगरपालिकेची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजमितीस येथील लोकसंख्या २५ लाखाच्या घरात गेली आहे. वाढणाऱ्या या लोकसंख्येला पाण्याचा पुरवठा करणे म्हणजे एक दिव्य होऊन बसले आहे. पूर्वी उसगाव आणि पेल्हार धरणातूनच चार नगरपालिकांना पाणी पुरवठा होत होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे अल्पमतातील सरकार वाचविताना वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या एकमताच्या बदल्यात या ठिकाणी सूर्या पाणी पुरवठा योजना मंजूर करून ती कार्यान्वित करून घेतल्याने येथील पाणी प्रश्न सोडविण्यास हातभार लागला होता. परंतु मुंबईला लागून असलेल्या या शहरात लोकांचे लोंढे मात्र येतच राहिल्याने तेही पाणी अपुरे पडत आहे.
पालिकेच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी सूर्या टप्पा २ चे पाणी एप्रिलपर्यंत वसई-विरार आणि मिरा-भाईंदर या शहरांना मिळणार आहे. त्याच प्रमाणे खोलसापाडा धरणाचे काम ही वेगात सुरू आहे. पालिकेच्या मालकीच्या देहर्जे धरणाच्या कामानेही गती घेतली आहे. असले तरी सद्या मात्र वसई-विरारकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच प्रशासनाच्या हातात असलेल्या पालिकेच्या कारभारामुळे पाणी वाटपामध्ये अनियंत्रित आल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. पूर्वी पालिकेत निवडून आलेले नगरसेवक असल्याने या ठिकाणी पाणी वाटपात तेवढी ओरड होत नव्हती. नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असला तरी तो पाणी प्रश्नावर जागरूक असल्याने पाणी प्रश्न गंभीर होताना दिसत नव्हता. त्यामुळे रखडलेल्या निवडणुकांचा फटकाही पाणी प्रश्नाला बसत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच इतकी वर्षे विरोधक ज्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरत होते. त्याच प्रश्नावर आता पालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत सत्तेवर असलेल्या बहुजन विकास आघाडीला प्रशासनाला रस्त्यावर उतरण्याचा इशारा द्यावा लागत असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये निवडणुकीचे राजकारण ही दडल्याचा आरोप विरोधक करत असले तरी पुन्हा एकदा वसई विरारच्या पाणी पेटण्याची संकेत आहेत.