ग्रामीण भागात कुत्र्यांची दहशत

ग्रामीण भागात कुत्र्यांची दहशत

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे झपाट्याने होत असलेले नागरिकरण, निर्माण होणारे घाणीचे साम्राज्य यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या फोफावत असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या वेळेस हे भटके कुत्रे पिसाळल्यानंतर नागरिकांना आपले लक्ष्य करीत आहेत. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या १० महिन्यात एक हजार २६० नागरिकांना कुत्र्यांनी लक्ष्य केले आल्याची बाब समोर आली आहे. या वाढत्या घटनांमुळे ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुत्र्यांची दहशत वाढली असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागाचे नागरिकरण होत असल्यामुळे जागोजागी निर्माण होणाऱ्या घाणीच्या व कचऱ्याच्या साम्राज्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या वाढीस लागली आहे. अशातच जागोजागी मोठ्या प्रमाणात उभ्या राहणाऱ्या चायनीजच्या गाड्या, या गाड्यांवरील शिल्लक राहिलेले अन्न ते या भटक्या कुत्र्यांना टाकत असतात. यामुळे या कुत्र्यांना मांस खाण्याची सवय लागलेली असते. त्यात एखाद्या वेळेस हे अन्न न मिळाल्यामुळे ही कुत्री पिसाळून रस्त्यावरून मोटारसायकलवरून ये-जा करणाऱ्यांचा पाठलाग करणे, लोकांच्या अंगावर धाऊन जाणे, लोकांचे विशेषता बालकांचे लचके तोडणे यांसारख्या घटना घडताना दिसुन येत आहेत. त्यामुळे भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा प्रश्न जटील होत चालला आहे.

-----------------
कोरोनानंतर दंश घटनेत वाढ
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड रुग्णालयात रुपांतर केल्यामुळे या रुग्णालयात केवळ कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील दोन वर्षांत भटक्या कुत्र्याने दंश केलेल्या रुग्णांची संख्या शून्य इतकी नोंदवली गेली आहे. दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने हॉटेल्स, रस्त्याकडेला उभ्या राहणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यानुसार एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या १० महिन्याच्या कालावधीत १ हजार २६० जणांना कुत्र्यांनी आपले लक्ष केले असल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे करण्यात आली.


............................................
भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेली संख्या

महिना चावा घेतलेल्याची संख्या
एप्रिल २०२२ १२८
मे २०२२ १३२
जून २०२२ १२३
जुलै २०२२ ६९
ऑगस्ट २०२२ ११३
सप्टेंबर २०२२ १०७
ऑक्टोंबर २०२२ १५१
नोव्हेंबर २०२२ १२१
डिसेंबर २०२२ १४४
जानेवारी २०२३ १७२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com