दहिसर गावचा पाणी योजनेला आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहिसर गावचा पाणी योजनेला आक्षेप
दहिसर गावचा पाणी योजनेला आक्षेप

दहिसर गावचा पाणी योजनेला आक्षेप

sakal_logo
By

मनोर, ता. १८ (बातमीदार) : जलजीवन मिशन योजनेअंतर्गत दहिसरतर्फे मनोर गावासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या पुढाकाराने दहिसर तर्फे मनोर गावात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष प्रकाश निकम यांनी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पाणीपुरवठा योजनेबाबतचे आक्षेप जाणून घेतले. ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सुधारित अंदाजपत्रक तयार करून पाणीपुरवठा योजना राबवण्याचे आदेश दिले.
आढावा बैठकीत पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी योजनेची सविस्तर माहिती दिल्यानंतर योजनेचा आढावा घेण्यात आला. दहिसर गावासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे पंधरा वर्षांचे नियोजन करण्यात आले होते. पाणी साठवण टाकी आणि वितरण व्यवस्थेतील जलवाहिन्यांचा आकार छोटा असल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला गावाचा विस्तार पाहता दोन साठवण टाक्या, गावाच्या चारही दिशांना वस्ती असलेल्या ठिकाणी जलवाहिन्या टाकणे आणि तीस वर्षांचे नियोजन करून सुधारित अंदाजपत्रक तयार करून योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. मंजूर असलेली पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांना मंजूर नसल्याने शाखा अभियंत्यांमार्फत गावाची पाहणी करून नवीन अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश प्रकाश निकम यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निवडंगे यांना देण्यात आले.
बैठकीला जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील, दहिसरच्या सरपंच अंकिता भोईर, उपसरपंच उल्हास ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गंगाधर निवडंगे, उपविभागीय अभियंता प्रदीप कुलकर्णी, शाखा अभियंता आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


-------------------
आयुर्वेदिक दवाखान्याचा विस्तार करण्‍याचे आदेश
प्रकाश निकम यांनी दहिसर तर्फे मनोर गावातील जिल्हा परिषदेच्या आयुर्वेदिक दवाखान्याला भेट देत इमारतीची पाहणी केली. शंभर वर्षे जुनी इमारत असल्याने इमारतीची दुरावस्था झाल्याचे दिसून आले. दवाखान्याच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारत दुरुस्ती आणि रुग्णांच्या सोयीसाठी इमारतीचा विस्तार करण्याचे आदेश आरोग्य विभागाच्या अभियंत्यांना दिले. ग्रामीण भागात असलेल्या दवाखान्यात दिवसाला चाळीस ते पन्नास रुग्णांवर उपचार केले जात असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामकाज आणि रुग्ण सेवेवर समाधान व्यक्त केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या विनया पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तन्वीर शेख उपस्थित होते.