निधीवरुन खासदारांची जुगलबंदी

निधीवरुन खासदारांची जुगलबंदी

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी कल्याणमध्ये उपस्थित होते. यावेळी निधी वाटपावरून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. नगरविकास मंत्री असल्यापासून कल्याणसाठी निधी मंजूर होत आहे. परंतु, भिवंडी मतदार संघास निधी मिळत नसल्याची खंत खासदार पाटलांनी व्यक्त केली. दरम्यान, ‘खासदार शिंदे यांनी पाटलांनी निधीसाठी थोडे सहकार्य करावे’, असे आवाहन केले होते. त्याला उत्तर देताना पाटलांनी शिंदे पिता-पुत्रांना कोपरखळ्या मारल्या. श्रीकांत यांनी ‘दररोज मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगत राहिले तर कल्याण लोकसभा मतदारसंघ सोडून उर्वरीत ठाणे जिल्ह्यासाठी जास्तीचा निधी मिळेल’, असे त्यांनी सांगताच मंचावर एकच हशा पिकला.
कल्याण व उल्हासनगर येथील विविध विकासकामांचे लोकार्पण बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, गणपत गायकवाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी, आयुक्त यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पण लोकार्पण सोहळा दोन खासदारांच्या तू तू-मै मै ने गाजला. यापूर्वी कळवा-मुंब्रा येथील विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर आता कल्याण मतदारसंघातील विकास कामांवरुन खासदार पाटील व शिंदे यांच्यात निधी मिळविण्यावरून जुगलबंदी रंगल्याचे दिसून आले.
कल्याण मतदार संघासाठी आणलेल्या निधीचा पाढा खासदार शिंदे यांनी वाचून दाखवित मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे ‘आमच्या अपेक्षा बंद होणार नाही’ असे सांगत विकासासाठी आणखी निधीची मागणी केली. ‘ठाणे जिल्ह्याचा मास्टर प्लॅन करा. तसेच एमएमआर क्षेत्राचा जो विकास करायचा आहे तो करा, जेणेकरुन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणूस सहज पोहोचू शकतो. यामुळे कल्याण पूर्वेचा विकास होईल’, असे खासदार शिंदे सांगत असतानाच मंचावर उपस्थित कपिल पाटील यांनी ‘कल्याण पश्चिमसाठीही प्रयत्न करा’ असे सांगितले. त्यावर ‘कल्याण पश्चिमेलादेखील निधी मिळाला पाहीजे. याठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. या भागातील रस्तेही चांगल्या स्थितीतील आहेत’, असे खासदार शिंदे यांनी सांगितले. तसेच मंत्री ‘पाटलांनी थोडे आम्हाला सहकार्य केले पाहिजे. थोडा निधी तिकडेपण दिला पाहिजे’ अशी मिश्किल टिपण्णी केली.
खासदार शिंदे यांच्या या टिपण्णीला खासदार पाटलांनी उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनाही काही कोपरखळ्या मारल्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाचे कौतुक पाटलांनी यावेळी केले. ‘गेल्या अडीच वर्षात घेतले गेले नाही ते निर्णय मुख्यमंत्र्यांनी सात महिन्यात घेत जनसामान्यांचा मुख्यमंत्री कसा असावा हे दाखवून दिले आहे’ असे म्हणत नंतर त्यांनी आपला बाण मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र शिंदे यांच्याकडे वळविला. ‘श्रीकांत बोलतात आम्हाला सहकार्य करा, मुख्यमंत्री शिंदे व आमच ट्युनिंग पहिल्यापासून चांगले आहे’ असे म्हणत आयुक्तांसोबत बैठक घेतल्यानंतर कल्याण पश्चिमेतील रस्त्यांच्या कामासाठी ५०० कोटींची मागणी केली असल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. हा निधी दिला तर पश्चिमेतील रस्ते डांबरी न राहता सिमेंट काँक्रीटीकरणचे होतील असा टोमणा त्यांनी लगावला. यावेळी मंचावर उपस्थित कल्याण पश्चिमेतील बाळासाहेबांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी देखील कपिल पाटलांना पाठिंबा देत त्यांच्या हा मध्ये हा मिळविली.

मनाला लागली चिंता!
मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नाही, त्यांना येथे येण्यासाठी वारंवार विनंती केली असे खासदार शिंदे यांनी म्हटले यावर खासदार पाटलांनी श्रीकांत यांना टोला लगावत मुख्यमंत्र्यांना म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना मतदार संघात राबवून आपण अजून लोकांपर्यंत पोहोचावे त्यासाठी शुभेच्छा देतो, पण खासदार शिंदे सांगतात साहेबांची वेळ मिळत नाही. आता श्रीकांत यांना वेळ मिळत नाही तर आम्हाला कशी मिळेल याची चिंता मनाला लागली आहे’ असे पाटील म्हणताच मुख्यमंत्री मिश्किल हसले. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, जनतेच्या आशीर्वादाने हा एकनाथ शिंदे राज्याचा मुख्यमंत्री झालाय. महाराष्ट्रात सगळीकडे फिरायला लागते म्हणून ठाण्याकडे कमी लक्ष जाते. ठाणे जिल्हा हा युतीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मला बाहेरच्या कार्यक्रमांना जायला मुभा दिली पाहीजे. तुम्ही सगळ्यांनी मिळून आपला गड असलेल्या ठाणे जिल्ह्याची तटबंदी अभेद्य राखण्याचे काम तुम्ही करायला पाहीजे’, असा सल्ला पाटलांना दिला.
...
वऱ्हाळ तलावाचा उल्लेख
भिवंडीतील वऱ्हाळ तलावाचा खासदार पाटील यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. भगवा तलावापेक्षा मोठा तलाव भिवंडीतील वऱ्हाळ तलाव आहे. भगवा तलावाच्या धर्तीवर भिवंडीतील वऱ्हाळ तलावाचा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे. तुमच्या मार्गदर्शनाखालीच ठाण्याचा विकास होणार आहे, असे पाटील म्हणाले. पाटलांच्या विनंत्या संपत नसल्याने यावेळी त्यांना भाषण उरकते घेण्याची सूचना करण्यात आली. त्यातही पाटलांनी शेवटची संधी काही सोडली नाही. ‘श्रीकांत नेहमी माझी बाजू मांडत असतात की तुम्ही मंत्री झाल्यामुळे मागणी करता येत नाही. तेच माझ्या वतीने मागणी करतात. दोन्ही लोकसभा मतदार संघाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. घरातल्या घरात आहात आपण...थोडेसे आमच्या विकासासाठी साहेबांच्या दररोज कानात जर सांगत राहिले तर जास्तीचा निधी कल्याण लोकसभा सोडून उर्वरीत ठाणे जिल्ह्यासाठी निश्चित मिळेल, असा मला विश्वास आहे.’ असे म्हणत त्यांनी शिंदे पिता पुत्रांना चिमटा काढला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com