
पोलिसांच्या लोभी वृत्तीमुळे आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : चिराग विरेया या सनदी लेखपालाच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मृत्युपूर्व चिठ्ठी सापडली आहे. मला पोलिसांनी खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या लोभी वृत्तीमुळे मला आत्महत्या करावी लागली, असा आरोप विरेयाने चार पानाच्या कथित चिठ्ठीत केला आहे. या चिठ्ठीवरील हस्ताक्षर जुळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याच्या सहकाऱ्यांना त्रास दिल्याचा उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे. या चिठ्ठीचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
५०० पेक्षा अधिक लोकांचे जीवन माझ्यावर अवलंबून होते. मी १०० वर्षे आयुष्य जगू शकलो असतो; मात्र पोलिसांच्या खोट्या कारवाईमुळे मला जीवन संपवावे लागले, असे त्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. पोलिस उपायुक्तांच्या नावाने ही चिठ्ठी लिहिली आहे, मात्र या चिठ्ठीत एकाही पोलिस अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख नाही. ज्या महिलेने आणि तिच्या पतीने बलात्काराचा खोटा आरोप केला, त्यांनी शक्य झाल्यास माझ्या गुंतवणूकदारांचे पैसै परत करावे, जीवनाच्या शेवटच्या क्षणाला मी खोटे बोलणार नाही, असे या चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे. बलात्काराच्या प्रकरणात भांडुप पोलिसांनी विरेया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर ३० जानेवारीला ४५ वर्षीय विरेया यांनी नाशिकच्या इगतपुरी येथील मित्राच्या फार्महाऊसवर फाशी घेत आत्महत्या केली होती.