
रंग मराठीचे
आधुनिक नवकथाकार
कथेमधील पात्रांच्या अंतर्मनात शिरून तेथील कंगोरे उलगडण्याचे कसब, हेच अरविंद गोखले यांच्या लेखनातील वेगळेपण ओळखले जाते. कथेसंबंधी वेगळ्या प्रकारचे चिंतन आणि नवीन वाटा दाखवून दिल्यामुळे त्यांना नवकथाकार म्हणून मान्यता मिळाली.
अरविंद विष्णू गोखले यांची आज जयंती. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९१९ रोजी उच्च विद्याविभूषित दाम्पत्याच्या पोटी सांगलीतील इस्लामपूरमध्ये झाला. ‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. १९४५ मध्ये सत्यकथेच्या विशेष अंकात ‘कोकराची कथा’ ही त्यांची कथा प्रकाशित झाली आणि तिने पूर्वापार चालत आलेले कथेचे स्वरूप आणि ढाचा मोडीत काढला. या कथेतच त्यांना आशय, अभिव्यक्ती यांच्या नवीन वाटा गवसल्या. अरुणा असफअली यांच्या प्रेरणेने त्यांनी एक गुप्त रेडिओ स्टेशन चालवून स्वातंत्र्यचळवळीतही सहभाग घेतला होता.
साधारण ५० वर्षे निष्ठेने लेखन करत साडेतीनशेहून अधिक कथा लिहिणारा गोखलेंसारखा लेखक विरळाच! या तपश्चर्येतून ३५ लघुकथा संग्रह, पाच लघुतम कथासंग्रह, सहा दीर्घकथा संग्रह, १० ललित लेखसंग्रह अशी विपुल साहित्यनिर्मिती त्यांनी केली. त्यांना केंद्र सरकारची ‘एमिरेटस् फेलोशिप’ मिळाली होती. १९९१ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फेही त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या तीन कथासंग्रहांना महाराष्ट्र सरकारची पारितोषिकेही मिळाली आहेत.
- गोविंद कदम