
ठाकरेंचे ४० नगरसेवक शिंदेंकडे?
मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १७ ः निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाताच आतापावेतो विंगेत वाट पाहणारे मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे ३५ ते ४० नगरसेवक मान्यता प्राप्ततेला शिरोधार्य मानणार आहेत. ‘मातोश्री’ची साथ सोडण्याच्या तयारीत असलेले विसर्जित मुंबई महापालिकेतील हे माजी नगरसेवक गेल्या चार महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते.
चिन्ह मिळाल्याशिवाय कोणताही निर्णय घेणे अनुचित ठरेल, असे या नगरसेवकांचे म्हणणे होते. मात्र, आता निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह असलेला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केले असल्याने हे नगरसेवक आता आपला नेता बदलतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतून निवडून आलेल्या जवळपास सर्व नगरसेवकांनी पक्षफुटीनंतर भेट घेतली आहे. मुंबई महापालिका हे ठाकरे कुटुंबाचे शक्तीस्थान मानले जाते. या महानगरात आणि कोकणात शिवसेनेवर जीव ओवाळून टाकणारी माणसे आहेत. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्री करण्याचा निर्णय अमान्य होता. आता आम्ही लवकरच मनातील निर्णय प्रत्यक्षात आणू, असे एका ज्येष्ठ माजी नगरसेवकाने सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय टप्प्याटप्प्याने प्रत्यक्षात आणला जाईल, अशी माहितीही नाव घोषित न करण्याच्या अटीवर या नेत्याने दिली. खरे तर नाव गुप्त ठेवण्याचे काही कारण नाही, मात्र एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून याबद्दलचा तपशील जाहीर करणे उचित ठरेल, असेही या नेत्याने सांगितले.
मध्य मुंबईतले नगरसेवक खासदार राहुल शेवाळे आणि आमदार यामिनी जाधव यांच्या माध्यमातून एकत्रित आले आहेत. शेवाळे आणि यामिनी जाधव यांचे पती यशवंत हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. महापालिकेतील प्रत्येक नगरसेवकाशी या दोघांचाही संपर्क आहे.
---
बाळासाहेबांचा भगवा महापालिकेवर फडकविणार
किरण पावस्कर यांनी नगरसेवकांनी साधलेला संपर्क हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे काम करत असल्याचा विश्वास असल्याने ते आमच्यासमवेत येणार आहेत असे सांगितले.
---
शून्यातून उठतील शिवसैनिक : मनीषा कायंदे
४० नगरसेवक आमच्याकडे येणार ही भाषा आधीपासूनच बोलली जात होती.आता नक्की किती जाणार ते पाहू .मात्र शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुन्यातून पुन्हा उभे राहू असा विश्वास आम्हाला दिला आहे.नवे लोक आमच्याकडे आणण्याची क्षमता निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आहे, अशी प्रतिक्रिया मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली.