
गावरान आंब्याचा गोडवा कमी
नवीन पनवेल, ता. १८ (वार्ताहर)ः उन्हाळ्यात गावरान आंब्याबरोबर इतर जातीचे आंबेदेखील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. अशा वेळी पनवेलसह रायगड परिसरात आंब्यांच्या झाडांना मोहोर आलेला दिसत नसल्याने यंदा गावरान आंबे कमी प्रमाणात खायला मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
आंब्याच्या हंगामात बाजारात आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात. पनवेल व परिसरात पूर्वी बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतात, बांधावर आंब्याची झाडे होती. त्या वेळी बाजारात व गावात सर्वत्र गावरान आंबे मोठ्या प्रमाणात मिळायचे. मात्र, शहरीकरणाच्या ओघात शेतीमध्ये घट झाली आहे. आंब्याचे झाडे अगदीच कमी प्रमाणात शिल्लक राहिली असल्याने यंदा मोजक्याच आंब्याच्या झाडांना मोहोर आलेला दिसत आहे. त्यामुळे यंदा गावरान आंबे कमी प्रमाणात चाखायला मिळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
--------------------------------
उन्हाळ्यात शरीरासाठी पोषक
उन्हाळ्याच्या दिवसात गावरान आंबा हा शरीरासाठी पोषक मानला जातो. त्यामुळे घराघरांत जेवणावळीला आंब्याचा रस बनतोच, त्यात गावरान आंब्याचा रस असल्यास जेवणाची लज्जत काही वेगळीच असते. त्यामुळे शरीरासाठी पौष्टिक आंबा उन्हाळ्यात खायलाच हवा, असे जुनेजाणत्या मंडळींकडूनदेखील सांगितले जाते. मात्र, यंदा मोजक्याच झाडांना मोहोर आल्याने आंबा मिळणार नसल्याचे दिसत आहे.