
पळस फुलला!
वसंत जाधव, नवीन पनवेल
वसंत ऋतूच्या सुरुवातीला फुलणारा पळस पनवेल परिसरात उन्हाळ्याच्या चाहुलीने फुलला आहे. वाढत्या तापमानामुळे झाडांमध्ये फुलांचे हार्मोन्स लवकर तयार होत आहेत. शेतीवाडीसह डोंगर, दऱ्यामध्ये पळसाला जानेवारीच्या मध्यापासूनच फुले येणे ही पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची घंटा असल्याचे ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ मिलिंद गिरधारी यांनी सांगितले.
निसर्गात थोड्या अंशी बदल घडणे स्वाभाविक आहे. मात्र, ऋतुचक्रात मोठ्या प्रमाणात होणारा बदल हा जैवविविधतेवर घाला आहे, अशी भीतीही गिरधारी यांनी व्यक्त केली.
पाऊस वेळेवर न पडणे, थंडीच्या दिवसात वाढता उष्मा, अवकाळी पाऊस, अशा अनेक बदल हवामानात घडत आहेत. वाढत्या तापमानामुळे पळसाच्या झाडाला वसंत ऋतूच्या अगोदर फुले येणे हा पर्यावरणाचा समतोल बिघडल्याचे संकेत आहेत. पनवेल परिसरातील डोंगर, दऱ्या, तटबंदी घाटामधील जंगलाचा परिसर पळसांच्या फुलांनी लाल भडक दिसत आहे. शिवाय, पळसाची झाडे सर्वांचे लक्ष वेधत आहेत. ऋतूनुसार झाडांना फळे, फुले येतात. त्यामुळे झाडांच्या जैवविविधतेची साखळी निर्माण होते; परंतु तापमानातील वाढ झाडांना बाधा पोहोचवत आहे.
कित्येक वर्षांपासून निसर्गचक्र बदलत चालले आहे. तापमान वाढीचा या सर्वांवर मोठा परिणाम होत आहे. वास्तविक पाहता पळस, शिसम वृक्ष पूर्ण पानगळ झाल्यानंतर फुलतात; परंतु अलिकडे निसर्ग चक्राच्या तीन महिनेआधी फुले येण्याच्या नोंदी झालेल्या आहेत.
- प्रा. मिलिंद गिरधारी, वनस्पती तज्ज्ञ