
हरित कर भरण्यासाठी फरपट
विरार, ता. १८ (बातमीदार) : वसई-विरारसह तसेच संपूर्ण पालघर जिल्ह्यातील १५ वर्षे उलटून गेलेल्या दुचाकी वाहन चालकांची हरित कर (ग्रीन टॅक्स) भरणे व अशा वाहनांची आरटीओकडून तपासणी करण्यासाठी ठाणे आरटीओ ऑफिसला चकरा मारण्यात फरपट होत आहे, अशी तक्रार अनेक दुचाकी वाहनचालक करीत आहेत.
पालघर जिल्ह्याची निर्मिती होण्यापूर्वी हा परिसर ठाणे आरटीओच्या अखत्यारीत येत असे. त्यामुळे दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी करणे, ती पास करणे यासाठी ठाणे आरटीओचे अधिकारी व कर्मचारी वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात आठवड्यातून दोन दिवस मुक्कामाला असत. त्यानंतर विरार येथे आरटीओ कार्यालय स्थापन करण्यात आले.
पालघर जिल्ह्यासाठी नवीन आरटीओ कार्यालय बनवण्यात आल्यानंतर दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी करणे ती पास करणे ही कामे करण्यासाठी स्वतंत्र आरटीओ विभाग (एमएच ४८) स्थापन करण्यात आला आहे. केंद्र सरकारने प्रदूषण नियंत्रणासाठी आता १५ वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांची तपासणी करणे व ती कालबाह्य झाली असतील तर अशी वाहने कायमची मोडीत काढणे आणि प्रदूषण करीत नसतील तर त्यांना आणखी पाच वर्षांची मुदतवाढ करून देताना त्यांच्याकडून ग्रीन टॅक्स वसूल करणे सक्तीचे केले आहे; परंतु यापूर्वी ठाणे आरटीओ अखत्यारीत (एमएच ०४) पास करण्यात आलेल्या अशा १५ वर्षे उलटून गेलेल्या वाहनांना विशेषतः दुचाकी वाहनांना वसई-विरारसह पालघर जिल्ह्यातील वाहनांना ठाणे येथील आरटीओ कार्यालयात घेऊन जाणे त्रासदायक बनले आहे.
==============
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे याचे विभाजन झाल्यानंतर वसई येथे उपप्रादेशिक कार्यालय सुरू झाले आहे. असे असले तरी अजूनही ठाणे येथील कार्यालयातील कागदपत्रे वसई कार्यालयात आलेली नाहीत. त्याचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. तरी ठाणे कार्यालयाने तातडीने कागदपत्रे वसईला द्यावीत.
- विजय खेतले, आटोरिक्षा आणि टॅक्सी महासंघ
===
ठाणे येथील कार्यालयाचे विभाजन होऊन वसईला उपप्रादेशिक कार्यालय झाले असले तरी अजूनही काही कागदपत्रे येथे येणे बाकी आहे. गाडीची कागदपत्रे सध्या ऑफलाईन आहेत. ते ऑनलाईन झाल्यास आणि ठाणे येथून गाडी मालकाने एनओसी आणल्यास बाकीचे काम करण्यात येईल.
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक अधिकारी, वसई