हरित इमारतींच्या दिशेने महापालिकेचे पहिले पाऊल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरित इमारतींच्या दिशेने महापालिकेचे पहिले पाऊल
हरित इमारतींच्या दिशेने महापालिकेचे पहिले पाऊल

हरित इमारतींच्या दिशेने महापालिकेचे पहिले पाऊल

sakal_logo
By

प्रकाश लिमये, भाईंदर
प्रदूषण नियंत्रण तसेच ऊर्जाबचत या दृष्टिकोनातून मिरा भाईंदर महापालिकेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग असलेल्या महापालिकेच्या हरित इमारत उपक्रमाची दखल भारतीय इमारत परिषदेने घेतली आहे. महापालिकेच्या मिरा रोड येथील विपश्यना केंद्र इमारतीला हरित इमारत म्हणून घोषित करून महापालिकेला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.
मिरा रोडमधील रामदेव पार्क भागात महापालिकेने विपश्यना केंद्र उभारले आहे. ही इमारत हरित इमारत व्हावी, यासाठी महापलिकेने नियोजन केले होते. त्यानुसार ही इमारत बांधतानाच त्याच्या आराखड्यात विविध हरित उपाययोजनांचा समावेश करण्यात आला. त्यात प्रामुख्याने प्रदूषण कमी करणे, ऊर्जेची बचत तसेच चांगले वातावरण निर्माण करणे यावर भर देण्यात आला. त्याची दखल घेत भारतीय हरित इमारत परिषदेने (आयजीबीसी) या इमारतीला हरित इमारत म्हणून घोषित केले. परिषदेतर्फे नुकतेच महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन सन्मानित केले. महापालिकेने निर्माण केलेल्या या हरित इमारतीपासून स्फूर्ती घेऊन शहरातील खासगी विकसकांनीही हरित इमारती उभारण्याचा प्रयत्न करावा आणि माझी वसुंधरा संकल्पनेला हातभार लावावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. या प्रकल्पासाठी टाटा टिस्कॉन स्टील बार, कृत्रिम वाळू आदी बांधकाम साहित्य, दर्जेदार रंग या हरित उत्पादनांचा वापर झाला आहे. हरित इमारत संकल्पनेसाठी महानगरपालिकेच्या वास्तुविशारद मुग्धा पत्की, शहर अभियंता दीपक खांबित, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, उपअभियंता यतिन जाधव यांनी विशेष मेहनत घेतल्याबद्दल आयुक्त दिलीप ढोले यांनी त्यांचा सन्मान केला.
..
काय आहे इमारतीमध्ये ?
इमारतीच्या परिसरातील ४३ टक्के क्षेत्रावर वेगाने वाढणारी झाडे तसेच स्थानिक प्रजातीची झुडपे यासह लँडस्केपिंग करण्यात आले आहे. पाण्याची बचत करण्यासाठी स्वच्छतागृहांमध्ये ड्युएल फ्लश, युरिनलसाठी प्रेसमॅटिक फ्लश, लो फ्लो हेल्थ नळ आणि वॉश बेसिन टॅपसारखी उपकरणे बसवून ३०.४९ टक्के पाण्याची बचत करण्यात आली आहे. शुद्ध हवा पुरवठ्यासाठी आवश्यक तरतुदीसह उच्च कार्यक्षमता असलेली वातानुकूलित यंत्रणा बसवून सभागृह व इतर ठिकाणी हवेशीर वातावरणनिर्मिती व पर्यावरण अनुकूल यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. इमारतीचे छप्पर बांधण्यासाठी इन्सुलेटिंग सामुग्रीचा वापर केल्याने ४० टक्के ऊर्जाबचतीचे ध्येय साध्य करण्यात आले आहे. तसेच इमारतीत जास्तीत जास्त काचेचा वापर करुन नैसर्गिक प्रकाशाची व्यवस्था होऊन विजेचा कमीत कमी वापर केला जातो. इमारतीत १०० टक्के एल.ई.डी. दिव्यांचा वापर करण्यात आला आहे. परिणामी दिवसाच्या प्रकाशाची ७६.६९ टक्के पातळी गाठली जाते.
...
वाहन चार्जिंग सुविधा
सुका कचरा ओला कचरा यासाठी इमारतीमध्ये विविध ठिकाणी विलगीकरण डबे बसविण्यात आले आहेत. विविध ठिकाणी नो स्मोकिंग धोरणानुसार नोस्मोकिंगची चिन्हे लावण्यात आली आहेत. सदर प्रकल्पात इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग सुविधा देण्यात आलेली आहेत. ही इमारत ६६१२ चौ.मी. क्षेत्र भुखंडावर बांधलेली असून बांधकाम क्षेत्र १००० चौ. मीटर; तर लँडस्केप क्षेत्र २,८३० चौ. मीटर एवढे आहे.