हागणदारी मुक्तीचे स्वप्न अद्याप अधुरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हागणदारी मुक्तीचे स्वप्न अद्याप अधुरे
हागणदारी मुक्तीचे स्वप्न अद्याप अधुरे

हागणदारी मुक्तीचे स्वप्न अद्याप अधुरे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १८ : रायगड जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रायगड दौऱ्यावर आले असताना प्रशासनाचे कौतुक केले होते. प्रत्यक्षात मात्र रायगड जिल्हा आजही हागणदारीमुक्त करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. आजही अनेक गावांत नागरिक उघड्यावर शौचास बसत आहेत. त्यामुळे १०० टक्के जिल्हा हागणदारीमुक्त कधी होणार? याचे उत्तर प्रशासनाकडेही नाही.
कागदोपत्री हागणदारीमुक्त जिल्हा असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पाणी आणि स्वच्छ्ता विभागाकडून नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून अद्याप रायगड जिल्ह्यात अडीच हजार कुटुंबाकडे शौचालये नाहीत, असे आढळून आले आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात जनजागृती केली जात आहे. गावागावांत स्वच्छता आणि आरोग्य राहावे यासाठी लोकांना वैयक्तिक शौचालये बांधण्याचे आवाहन सरकारतर्फे केले जाते. उघड्यावर शौच केल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे वैयक्तिक शौचालय घरोघरी बांधण्यासाठी प्रशासनातर्फे अभियान राबवण्यात येत होते. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. आजही शौचालय किती महत्त्वाचे आहे, याबाबत नागरिक अजूनही अजाण असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते.
***
कागदोपत्री हागणदारीमुक्त जिल्हा
२०१२ च्या बेस लाईन सर्व्हेनुसार रायगड जिल्ह्यात ३ लाख ४० हजार ८८४ इतके वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट होते, ते १०० टक्के पूर्ण झाले आहे. २०२२/२३ साठी ४ हजार १५० वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी २ हजार ३९८ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, १ हजार ७५२ बांधकाम अपूर्ण आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने दिली आहे. जर जिल्हा हा ओडीएफ अंतर्गत हागणदारीमुक्त झाला असला तरी आजही वैयक्तिक शौचालय बांधकामे होतच आहेत.
***

मोहीम राबवण्याची गरज
जिल्ह्याला समुद्रकिनारे लाभले आहेत. एकीकडे हागणदारीमुक्त जिल्हा असताना किनाऱ्यावर मात्र आजही अनेक जण उघड्यावर शौचास बसलेले पाहायला मिळतात. काही ग्रामपंचायत हद्दीत नागरिक उघड्यावर शौचास बसतात. त्यामुळे प्रशासनाने जिल्हा हागणदारीमुक्त होण्याबाबत पुन्हा एकदा मोहीम राबविणे गरजेचे झाले आहे. यासाठी नागरिकांचेही सहकार्य महत्त्वाचे आहे. तरच जिल्हा हा १०० टक्के हागणदारीमुक्त होण्याचे स्वप्न साकारू शकेल.